मुलानेच जन्मदात्याला टाकले वाळीत
By Admin | Updated: January 30, 2015 04:16 IST2015-01-30T04:16:18+5:302015-01-30T04:16:18+5:30
श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल या गावातील कुणबी जातपंचायतीने नथुराम (८५) व लक्ष्मी घडशी (७५) या दाम्पत्याला गेल्या सहा वर्षांपासून वाळीत

मुलानेच जन्मदात्याला टाकले वाळीत
जयंत धुळप, अलिबाग
श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल या गावातील कुणबी जातपंचायतीने नथुराम (८५) व लक्ष्मी घडशी (७५) या दाम्पत्याला गेल्या सहा वर्षांपासून वाळीत टाकल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. यात या दाम्पत्याचा मुलगाच सहभागी आहे. या प्रकरणी घडशीने भरडखोल कुणबी जातपंचायतीविरोधात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर व रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याकडे तक्रार केली आहे.
नथुराम घडशी यांच्या मालकीची भरडखोल येथे जमीन आहे. त्यात पूर्ण हिस्सा पाहिजे, अशी मागणी त्यांचाच मुलगा राजेश घडशी याने केली. त्या वेळी, तुझ्या लग्नाकरिता घेतलेले कर्ज आधी फेडले तरच मी तुला जमिनीमध्ये हिस्सा देईन, असे वडिलांनी सांगितले. त्यामुळे रागावून राजेश जातपंचायतीकडे गेला. त्याचे सासरे दामू नागले व त्यांचा भाऊ शंकर नागले हे गावकीचे अध्यक्ष होते. राजेशला हिस्सा देण्याचा आदेश जातपंचायतीने २००७ साली दिला. परंतु नथुराम निर्णयावर ठाम राहिले. परिणामी, घडशी दाम्पत्याला सहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आले आहे. या प्रकरणी या वृद्ध दाम्पत्याने भरडखोल कुणबी जात गावकीचे अध्यक्ष शंकर नागले, गोविंद
घडशी, कृष्णा शिगवण, महिला गावकी अध्यक्षा विजया खळे, महादेव हुमणे, सुरेश वागजे, सीताराम वागजे, रामचंद्र ठोंबरे, दामू नागले, कमल नागले, रुपा हुमणे, निर्मल घडशी, सदानंद काजारे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी या प्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. घडशी यांचा मोठा मुलगा हरिश्चंद्र यालाही त्याची पत्नी अर्चना देवदेवस्की करत असल्याचा आरोप करत वाळीत टाकण्यात आले होते. त्याच्याकडे २० हजार रुपयांची भरपाई मागितली होती. मात्र त्यांनी ती अमान्य केली. परंतु अवहेलना सहन न झाल्याने त्याने चार वर्षांनी दंड भरला आणि बंदीतून सुटका करून घेतली. त्यानंतर तो कुटुंबियासह गाव सोडून पनवेलला गेला.
मुख्यमंत्री व मानवी हक्क आयोगाकडे तक्रार पार्वती धाडवे या वयोवृध्द महिलेला देखीलगावपंचांनी १५ वर्षे वाळीत टाकले असल्याचेही या निमीत्ताने समोर आले आहे. याबाबत नथुराम घडशी यांनी आपल्या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, श्रीवर्धन उपविभागीय महसूल अधिकारी, श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन तहसीलदार व मानवी हक्क आयोग यांना पाठविल्या आहेत.