बोअरवेलच्या खड्ड्यात पडला बालक

By Admin | Updated: February 1, 2015 01:01 IST2015-02-01T01:01:51+5:302015-02-01T01:01:51+5:30

शेतातील १५० फूट खोल बोअरवेलमध्ये एक अडीच वर्षीय बालक पडून आतमध्ये अडकल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

Child falling in the borewell pothole | बोअरवेलच्या खड्ड्यात पडला बालक

बोअरवेलच्या खड्ड्यात पडला बालक

निंगनूरची घटना : बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
फुलसावंगी (यवतमाळ) : शेतातील १५० फूट खोल बोअरवेलमध्ये एक अडीच वर्षीय बालक पडून आतमध्ये अडकल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ४० फूट खोलवर तो चिखलात रूतून बसला असून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न चालविले आहेत.
शंकर सुरज आखरे असे बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. निंगनूर येथील नईम अली रजाक अली यांच्या शेतात एक बोअरवेल खोदण्यात आली. मात्र त्याला पाणी न लागल्याने केसिंग टाकले नाही. त्यावर पोते व तुराट्या टाकून झाकून ठेवली आहे. शनिवारी काही मजूर शेतात निंदणाचे काम करीत होते.
त्यावेळी सुरज आखरे, त्याची बहीण पूजा आपल्या आईसोबत या शेतात गेले होते. शेतात खेळताना अचानक सुरज बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्याकडे गेला आणि काही कळायच्या आत तो या खड्ड्यात कोसळला.
त्याने जोराने आवाज दिल्याने सर्व मजूर व शेतमालक नईम अली धावून आले. पाहतात तो काय, सुरज बोअरवेलच्या खड्ड्यात आतमध्ये पडला होता. या घटनेची माहिती महागावचे तहसीलदार डॉ. सचिन शेजाळ व उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला यांना देण्यात आली.
या घटनेची प्रशासनाने तत्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. बचावासाठी मदत सुरू झाली. तालुका वैद्यकीय अधिकारी जब्बार पठाण यांच्या पथकाने बोअरवेलमध्ये आॅक्सिजन पुरवठा सुरू केला तर त्याला पाणी व बिस्कीट दोराच्या साहाय्याने बांधून आतमध्ये सोडण्यात आले.
सुरज आतून आई-आई असा सारखा आवाज देत आहे. आई बोअरवेलजवळ बसून त्याला धीर देत आहे. दरम्यान, दोन जेसीबीच्या मदतीने बोअरवेलच्या जवळ १० फूट अंतरावर खड्डा खोदून सुरजला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. उमरखेड येथून अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. उमरखेड आणि महागावचे पोलीसही घटनास्थळावर पोहोचले. वृत्त लिहिस्तोवर युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू होते. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य राम राठोड यांच्यासह गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उजेडासाठी याठिकाणी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकजण सुरज सुखरूप बाहेर यावा यासाठी प्रयत्न करीत आहे. बोअरवेलमध्ये एखादा बालक पडण्याची ही विदर्भातील पहिलीच घटना असावी. शेकडो नागरिकांनी निंगनूर येथील शेतात गर्दी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Child falling in the borewell pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.