बालविकास प्रकल्प अधिकारी गजाआड
By Admin | Updated: September 12, 2014 02:41 IST2014-09-12T02:41:12+5:302014-09-12T02:41:12+5:30
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादीच्या मुलीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज केला होता

बालविकास प्रकल्प अधिकारी गजाआड
मुंबई : अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी देण्यासाठी २५ हजारांची लाच घेणा-या बालविकास प्रकल्प अधिकारी उज्ज्वला सदाशिवराव पाटील (४०) आणि अंगणवाडी सेविका अनिता निवृत्ती माने (३२) या दोघींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. प्रकल्पअधिकारी हे पद वर्ग १मध्ये मोडते.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादीच्या मुलीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज केला होता. अर्जदार मुलीला आरोपी माने हिने फोन करून ट्रॉम्बेतील अंगणवाडीत बोलावून घेतले. नोकरी हवी असेल तर ३० हजार मोजावे लागतील, असे मानेने या मुलीला सांगितले. पुढे प्रकल्प अधिकारी पाटील यांनी २५ हजार इतकी रक्कम ठरवली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने या मुलीने एसीबीकडे तक्रार दिली. तथ्य आढळल्याने पाटील व माने यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. गुरुवारी बेलापूर, रायगड भवन येथील ट्रॉम्बे नागरी प्रकल्प कार्यालयात सापळा रचला. त्यात माने हिने मुलीकडून २५ हजारांची लाच घेतली आणि ती पाटील यांच्या हाती दिली. पाटील यांनी रक्कम घेतल्यानंतर एसीबी अधिकाऱ्यांनी दोघींना रंगेहाथ अटक केली. (प्रतिनिधी)