पालिकेचे कंत्राटदाराला संरक्षण
By Admin | Updated: April 30, 2016 03:05 IST2016-04-30T03:05:58+5:302016-04-30T03:05:58+5:30
अंबरनाथ पालिकेच्या एकमेव हिंदू स्मशानभूमीचे नूतनी आणि सुशोभिकरण करण्यासाठी पालिकेने एक कोटींची तरतूद केली होती.

पालिकेचे कंत्राटदाराला संरक्षण
अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या एकमेव हिंदू स्मशानभूमीचे नूतनी आणि सुशोभिकरण करण्यासाठी पालिकेने एक कोटींची तरतूद केली होती. साडेतीन वर्षात हे काम पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराने अनेकवेळा स्मशानभूमीचे काम बंदही केले होते. असे असतांनाही पालिका प्रशासन कंत्राटदाराची बाजू घेत आहे. एवढेच नव्हे तर या कामाला मुदतवाढ देण्याचा प्रयत्न करत आहेत. आधीचेच काम पूर्ण झालेले नसतांना पुन्हा नव्याने ४५ लाखाची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंत्राटदाराला काम करण्यास विलंब झाल्याने त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला मुदतवाढ देण्याचा घाट पालिका प्रशासन करत आहे.
अंबरनाथची लोकसंख्या वाढल्याने जुन्या स्मशानभूमीवर प्रचंड ताण पडत होता. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१० मध्ये प्रशासनाने जुन्या स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याचा ठराव मंजूर केला होता. या कामाला तांत्रिक मंजुरी घेतल्यावर १६ जुलै २०१२ मध्ये काम सुरु करण्याचे आदेश पालिकेने दिले. सागर कंस्ट्रक्शन कंपनीला हे काम दिले होते. या नूतनीकरणाच्या कामासाठी ९४ लाख ६३ हजाराची तरतूद केली. त्यातील ९१ लाख २५ हजार आत्तापर्यंत खर्चही झाले. जी तरतूद केली होती त्यातील ९६ टक्के निधी खर्च झालेला असतांनाही प्रत्यक्षात स्मशानभूमीचे काम मात्र अर्धवटच राहिले. मूळ निविदेत जी कामे प्रस्तावित केली होती ती कामे पूर्ण केलेली नाही. अर्धवट परिस्थितीत स्मशानभूमी असतांनाही या कामाचे बिल मात्र थांबविलेले नाही. कामाची पाहणी न करताच बिले दिली.
या ठिकाणी केलेल्या कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. असे असतानाही कंत्राटदाराला पाठिशी घालत पालिकेने टप्प्याटप्प्याने बिले काढली आहेत. काम अर्धवट असताना उर्वरित कामासाठी पालिकेने नव्याने ४५ लाखाची तरतूद केली आहे. जी कामे पूर्वीच्या निविदेतून करणे अपेक्षित होते, तेच कामे पूर्ण करण्यासाठी नवी तरतूद करुन या कामामध्ये गैरकारभार करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. हा प्रकार येथेच थांबलेला नाही. कंत्राटदाराने काम वेळेत पूर्ण न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासन या कंत्राटदाराला सांभाळून घेण्यासाठी आटापिटा करत आहे. (प्रतिनिधी)
>सहा महिन्यांपूर्वी झाले होते सुशोभिकरण
स्मशानभूमीच्या नूतनीकरण कामाचे आदेश देण्याच्या सहा महिनेआधीही याच स्मशानभूमीमध्ये सुशोभिकरण आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामे झाले आहे.
तसेच स्मशानभूमीचे काम सुरु असतानाही पालिकेने याच ठिकाणी अनेक नवीन कामे केली आहेत. त्यांची बिले देखील काढली आहेत.
असे असताना पुन्हा ४५ लाखाची तरतूद करुन पालिका स्मशानभूमीच्या कामात गैरकारभाराची मुहुर्तमेढ रोवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या संदर्भात अधिकारी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत.
>विलंबाची जबाबदारी पालिकेने घेतली
दंड लावणे तर दूरच त्या कंत्राटदाराला मुदतवाढ देता यावी यासाठी कामाला झालेल्या विलंबाची जबाबदारी पालिकेने स्वत:वर घेतली आहे. स्मशानभूमीचा वापर होत असल्याने कामात व्यत्यय येत असल्याचे कारणही सोबत जोडले आहे. ठेकेदाराला सांभाळून घेण्यासाठी पालिकेने केलेला हा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. स्मशानभूमीत मानवी हाडे सापडत असल्याने पोलिसांची परवानगी घेणे गरजेचे आहे असेही कारण दिले आहे. स्मशानभूमीत कामासाठी खोदकाम करताना मानवी हाडे सापडणे हे सर्वज्ञात आहे.