आघाडी तोडण्याचे पाप मुख्यमंत्र्यांचेच !
By Admin | Updated: September 27, 2014 00:57 IST2014-09-27T00:56:03+5:302014-09-27T00:57:16+5:30
आर. आर. पाटील : लोकसभेतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी

आघाडी तोडण्याचे पाप मुख्यमंत्र्यांचेच !
सांगली : राज्यातील आघाडी तुटण्याच्या पापाला काँग्रेस आणि विशेषत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. ते महाराष्ट्रात आल्यापासून दोन्ही पक्षांतील दुरावा वाढतच गेला होता. राष्ट्रवादीचा एकही मंत्री मनमोकळेपणे काम करीत नव्हता. मुख्यमंत्री पदाच्या अधिकारांचा वापर कामकाजात हस्तक्षेप करण्यासाठी होत होता, अशा शब्दात आज, शुक्रवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथील पत्रकार बैठकीत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले की, लोकसभेतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला होता. तेव्हापासून राष्ट्रवादीला नाउमेद करण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही. राष्ट्रवादीला बाजूला करून देश व राज्यपातळीवर एकमेव मित्र काँग्रेसने गमावला आहे. जागावाटपाच्या चर्चेला काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतच थांबवून ठेवले. कोणत्याही अटी न घालता त्यांच्यामागे फरफटत या, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविणारी होती. वस्तुत: मुख्यमंत्र्यांवर सर्वांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी होती. मालेगाव, नंदुरबार, नवापूर या मतदारसंघातील आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही काँग्रेसने तेथील उमेदवारांच्या नावाची एकतर्फी घोषणा केली. मुंबईत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवून मुख्यमंत्री चव्हाण स्वत:च्या मतदारसंघात निघून गेले. त्यामुळे आघाडी तोडण्यात राष्ट्रवादीचा दोष नसून त्याला काँग्रेसच जबाबदार आहे.
१९९९ मध्ये दोन्ही पक्ष वेगळे लढले, तेव्हाही राष्ट्रवादीचे ५८ आमदार होते. आता ७० मतदारसंघात पक्षाकडे शक्तिशाली नेते आहेत. ही संख्या वाढू शकते. त्यामुळे आघाडी तुटण्याचा राष्ट्रवादीला फटका बसणार नाही. उलट या निवडणुकीत काँग्रेस व भाजपला किंमत मोजावी लागणार आहे. (प्रतिनिधी)