कंत्राटांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
By Admin | Updated: February 7, 2016 02:19 IST2016-02-07T02:19:57+5:302016-02-07T02:19:57+5:30
मुंबई महापालिका आणि तिचे कंत्राटदार यांच्यात २००९ पासून झालेल्या कंत्राटांची चौकशी मुंबई पोलीस करणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या नेतृत्वाखालील

कंत्राटांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : मुंबई महापालिका आणि तिचे कंत्राटदार यांच्यात २००९ पासून झालेल्या कंत्राटांची चौकशी मुंबई पोलीस करणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या नेतृत्वाखालील तुकडी ही चौकशी करील. देवनार डंपिंग यार्डला लागलेल्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. ही चौकशी करण्यास मनोज लोहिया यांना सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी १५ दिवसांत करण्यास सांगितले असले तरी ही आग हा अपघात होता की मुद्दाम लावण्यात आली होती या बद्दलचा निष्कर्ष काढण्याआधी चौकशीचे स्वरूप काय असेल हे समजून घेण्यासाठी आम्ही मुदत वाढवून मागू, असे अधिकारी म्हणाले.
आम्ही कंत्राटदारांना २००९ पासूनच्या कंंत्राटाच्या दस्तावेजांसह बोलावले असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कंत्राटाचा तपशील समजावून देण्यास सांगण्यात आले आहे. आगीची घटना ही अपघात होती की खोडसाळपणा होता, हे निश्चित करणे हे माझे काम आहे, असे मनोज लोहिया म्हणाले.
दुसऱ्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रोज सुमारे एक हजार मुले कचरा गोळा करण्यासाठी डंपिंग यार्डवर जातात व छोट्या ढिगांना आग लावतात. त्यामुळे कागद जळून जातो व त्यातून त्यांना काही लोखंड हाती लागते. मुद्दाम आग लावण्याचे काम एकमेकांचे विरोधी असलेल्या कंत्राटदारांनी केले आहे का हेही आम्ही तपासणार आहोत. काही कंत्राटांची मुदत ३१ जानेवारी रोजी संपणार होती आणि कंत्राटदारांना ते पुन्हा मिळवायचे होते, असे वरिष्ठ भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याने सांगितले. तेथे काही प्रोसेसिंग युनिट उभारली जाणार असून, काही कंत्राटदार त्यासाठी तेथे जागेची मागणी करीत आहेत. ही आग त्यासाठी लावण्यात आली होती का याचा तपास केला जात आहे, असे हा अधिकारी म्हणाला. डंपिंग यार्डजवळच्या पोलीस ठाण्यांचे अनेक पोलीस कर्मचारी तसेच उप पोलीस आयुक्त संग्रामसिंग निशानदार डंपिंग यार्डवर जाऊन आजारी पडले आहेत. आगप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन अज्ञात मुलांवर गुन्हा नोंदविला आहे.