विस्तारावर मुख्यमंत्र्यांची छाप!
By Admin | Updated: July 9, 2016 02:53 IST2016-07-09T02:53:11+5:302016-07-09T02:53:11+5:30
भाजपामध्ये असलेली खदखद दूर करत, शिवसेनेला दोन राज्य मंत्रिपदांवरच समाधान मानायला लावत आणि विनायक मेटेंना ठेंगा दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आॅपरेशन मंत्रिमंडळ

विस्तारावर मुख्यमंत्र्यांची छाप!
- यदु जोशी, मुंबई
भाजपामध्ये असलेली खदखद दूर करत, शिवसेनेला दोन राज्य मंत्रिपदांवरच समाधान मानायला लावत आणि विनायक मेटेंना ठेंगा दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आॅपरेशन मंत्रिमंडळ विस्तार’ यशस्वीपणे पार पाडले. भाजपामधून सात जणांना मंत्री करताना मुख्यमंत्र्यांनी निष्ठावंतांना संधी दिली.
भाऊसाहेब फुंडकर, संभाजी पाटील निलंगेकर आणि जयकुमार रावल या तिघांची मंत्रिपदाची प्रतीक्षा आजच्या विस्तारात संपली. कधी खामगावमधून तर कधी सिंदखेडातून ऐकू येणारी धुसफूस आता थांबली. निलंगेकर आणि सुभाष देशमुख या नितीन गडकरी समर्थकांना सामावून घेत गटातटाच्या राजकारणाला छेद दिला.
कॅबिनेट मंत्रिपदाची आस लागून असलेले यवतमाळचे आमदार मदन येरावार यांना राज्यमंत्री पदावर समाधान मानण्यास मुख्यमंत्र्यांनी राजी केले. त्याचवेळी धनगर समाजामध्ये लढाऊ नेता अशी प्रतिमा असलेले महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांनी सन्मान केला. याच समाजाचे असलेले भाजपाचे राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन धनगर समाजात आणखी एक वाटेकरी मुख्यमंत्र्यांनी तयार ठेवला आहे.
शिवसेना विस्तारात सहभागी होणार नाही, या बातम्या खोट्या ठरवत मुख्यमंत्र्यांनी विस्ताराचे रोपटे लावले आणि त्यात उद्धव यांना पाणी टाकायला लावले. जानकर आणि सदाभाऊ खोत हे दोन्ही मित्रपक्षांचे पण जानकर आघाडीवरील नेते तर खोत हे खा. राजू शेट्टींनंतरचे क्रमांक २चे नेते. या फरकावर नेमके बोट ठेवत त्यांनी सदाभाऊंना राज्यमंत्रिपद दिले. जानकरांनी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांना मारलेली मिठी बरेच काही सांगून गेली.
आजच्या विस्तारात दहा नवीन मंत्र्यांपैकी सहा मराठा समाजाचे आहेत. मराठा समाजाचा मंत्रिमंडळातील टक्का त्यामुळे वाढला. छत्रपती संभाजी राजे यांना दिलेली राज्यसभेची खासदारकी, तीन मराठा आमदारांना कॅबिनेट मंत्री करीत यापुढे आपण मेटेंवर अवलंबून नसल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी समाजाला फुंडकर यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाले.
शपथ घेण्याची निरनिराळी तऱ्हा
मंत्रिमंडळाच्या शुक्रवारच्या विस्तारात शपथ घेण्याची मंत्र्यांची निरनिराळी तऱ्हा पाहायला मिळाली. मंत्रिपदाची शपथ घेताना काहींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना तर काहींनी घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आदींचे स्मरण केले.
सर्वच मंत्र्यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. मात्र, आपापल्या श्रद्धास्थानांचा सुरुवातीलाच उल्लेख केला. महादेव जानकर यांनी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अन् लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना स्मरून शपथ घेत असल्याचे सुरुवातीलाच सांगितले. आपल्या नावाचा उल्लेख करताना त्यांनी आईचेही नाव घेतले.
गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर या शिवसेनेच्या दोन्ही मंत्र्यांनी आधी स्मरण केले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे. गुलाबरावांनी बाळासाहेबांसोबतच काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना स्मरून शपथ घेत असल्याचे सांगितले.
सदाभाऊ खोत यांनीही शेतकऱ्यांचे स्मरण याच शब्दात केले. जयकुमार रावल यांनी खान्देशातील अहिराणी भाषेतून सुरुवात केली. महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांचे त्यांनी स्मरण केले. राज्यपालांनी शपथेसाठी अनुमती देण्यापूर्वीच गुलाबराव पाटील यांनी शपथ घ्यायला सुरुवात केली. राज्यपालांनी त्यांना थांबवले; अनुमती दिली मग गुलाबरावांनी शपथ घेतली. ते आणि खोतकर
मंत्री झाल्याने मंत्रिपदापासून
वंचित राहिलेल्या दोन कट्टर शिवसैनिकांना संधी मिळाल्याची कौतुकमिश्रित चर्चा होती.
जिल्हानिहाय संतुलन साधण्यात अपयश
आजच्या विस्तारात भाजपाच्या दृष्टीने जिल्हानिहाय संतुलन साधण्यात मात्र मुख्यमंत्र्यांना अपयश आले.
एक खासदार आणि तीन आमदार देणारा सांगली जिल्हा आणि एकाच शहरातील चारही आमदार भाजपाचे असलेल्या नाशिकला प्रतिनिधित्व मिळाले नाही.
एकावेळी चार-चार मंत्री राहिलेल्या सांगलीला ठेंगा मिळाला. विस्तारात एकाही महिलेला संधी मिळाली नाही. ३९ सदस्यांच्या मंत्रिमंडळात केवळ दोन महिला आहेत.
मुख्यमंत्र्यांशी असलेली मैत्री जयकुमार रावल, राम शिंदे यांना पावली; पण डॉ. संजय कुटे यांना काही पावली नाही. चैनसुख संचेती यांच्याशी असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक संबंधावर फुंडकर भारी पडण्याचे काय कारण होते? संचेती परिवारातून दिल्लीत असलेल्या नावामुळे चैनसुख यांचे घोडे अडल्याचे मानले जाते.