CM Devendra Fadnavis: "नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल, असे मोठे संमेलन केंद्र (कन्व्हेन्शन सेंटर) उभारावे," अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्या.
सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत फडणवीस यांनी कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, साधुग्राम, नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण, पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगीक विकास कामे आदींबाबतचा आढावा घेतला.
नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रॅण्डींग करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, नाशिक – त्र्यंबकेश्वर रीलिजियस कॉरीडॉरची निर्मिती करून नाशिक ‘रीलिजिअस हब’ म्हणून विकसित करावे. प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावे. गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावे. नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. नाशिक येथे साधुग्रामकरिता अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याने तेथील जमिन संपादित करण्यात यावी. येथे नगररचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरीत करावे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत, अशा ठिकाणची अतिक्रमण तत्काळ हटवावीत, अशाही सूचना त्यांनी केल्या.
या कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून पर्यटक दर्शनसाठी येत असतात. पर्यटक तसेच भाविकांच्या सोयीसाठी नाशिक येथे ८ ते १० हेलिपॅड तयार करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी इगतपुरी ते नाशिक हा मार्ग प्रशस्त करून नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांचे क्राँक्रीटीकीकरण तसेच रूंदीकरण करण्यात यावे. जे मार्ग २०२७ पर्यंत बांधणे शक्य आहे, असेच बांधकाम हाती घेण्यात यावे. इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता चारपदरी करण्यात यावा. वाढवण, मुंबई, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर येथून नाशिककडे येणारे रस्ते तसेच रिंग रोड आदी रस्ते अद्ययावत करण्यात यावे. नागरिक तसेच भाविकांच्या सुविधेसाठी राम काल पथ बरोबरच त्र्यंबकेश्वर येथे रीलिजिअस कॉरीडॉर करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी केल्या.
या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस विभागाकडून आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पोलीसांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर जागोजागी लागणारे सीसीटीव्ही, बॅरिकेंटींग, सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ज्या अडचणी येत असतील, त्या सोडविण्यात याव्यात. साधुग्रामकरिता संपादित केलेल्या जागेवर वृक्षतोड न करता साधुंच्या निवासाची व्यवस्था करावी. कुंभ परिसरात पाणी स्वच्छ राहील, याची विशेष दक्षता घ्यावी. मुबलक प्रमाणात प्रसाधन गृहे तयार करण्यात यावीत. जलपर्णीबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करा. तसेच कुंभमेळ्यादरम्यान कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या.