मुख्यमंत्री विधानसभा लढवणार
By Admin | Updated: July 14, 2014 04:09 IST2014-07-14T04:09:37+5:302014-07-14T04:09:37+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व मीच करणार आहे -मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्री विधानसभा लढवणार
क-हाड : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व मीच करणार आहे, असे ठामपणे सांगत असतानाच कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्यास कऱ्हाड दक्षिणेतून स्वत: उभे राहण्याबाबत विचार करू,’ असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले़
मुख्यमंत्री चव्हाण रविवारी कऱ्हाड दौऱ्यावर असताना त्यांनी जखिणवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे़ राष्ट्रवादी अन्् आम्ही एकत्रितच लढू़ लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन काही बदल करवून घेणार आहोत़ माहिती आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणार आहोत. सध्या उमेदवार निवडीचा पहिला अन् महत्त्वाचा टप्पा डोळ्यांसमोर आहे़ त्या दृष्टिकोनातून विदर्भ अन् पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँगे्रस नेत्यांची बैठक झाली असून, इतर ठिकाणच्या लवकरच बैठका होणार आहेत़
जिल्हा काँग्रसने शनिवारी पक्ष निरीक्षकांकडे तुम्ही दक्षिणेतून लढावे, असा ठराव केलाय आणि कार्यकर्त्यांचीही तशी अपेक्षा आहे, असे सांगताच, कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचा जरूर विचार करू, असे उत्तर देत त्यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेतच दिले आहेत़ मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या पेरणाऱ्यांचा शोध लागला का? असा सवाल करताच ‘काहींची नावे कळालीत. काहींची कळतील,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)