मुख्यमंत्री महोदय हे दीनदयाल उपाध्याय कोण आहेत? : सचिन सावंत
By Admin | Updated: June 15, 2017 18:40 IST2017-06-15T18:32:21+5:302017-06-15T18:40:48+5:30
दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती वर्षानिमित्त राज्य सरकार साडे चार कोटी रूपये खर्च करून त्यांच्या जीवनावरील पुस्तके खरेदी करणार आहे.

मुख्यमंत्री महोदय हे दीनदयाल उपाध्याय कोण आहेत? : सचिन सावंत
>ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 15 - दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती वर्षानिमित्त राज्य सरकार साडे चार कोटी रूपये खर्च करून त्यांच्या जीवनावरील पुस्तके खरेदी करणार आहे. ज्यांच्यावरील पुस्तकांवर सरकार इतका मोठा निधी खर्च करणार आहे, ते दीनदयाल उपाध्याय कोण आहेत? याची माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी, असा उपरोधिक टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.
दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने उपाध्याय यांच्या जीवन कार्यावर आधारीत पुस्तके खरेदी करण्यासाठी राज्यातील जनतेचे साडेचार कोटी रूपये खर्च करणार आहे. दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनपरिचय सांगणारी ही पुस्तके खरेदी करून राज्यातील ग्रंथालयांना देण्यात येणार आहेत. प्रत्येकी साडेचार हजार रूपये किंमत असणारी 10 हजार पुस्तके राज्य सरकार खरेदी करणार आहे. भारतीय जनता पक्ष 2016-17 हे वर्ष दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करित आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या निधीतून ही पुस्तके खरेदी केली असती तर त्याला कोणाची हरकत असण्याचे कारण नव्हते. पण राज्य सरकार सर्वसामान्य करदात्यांच्या पैशातून ही पुस्तके का खरेदी करित आहे? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असे सावंत म्हणाले.
तसेच दीनदयाल उपाध्याय यांनी स्वातंत्र्यसंग्रामात काय योगदान दिले? ते स्वातंत्र्यासाठी कोणत्या तुरुंगात गेले होते ? देशासाठी त्यांनी काय त्याग केला? देशातील मुस्लीम समाजाबद्दलची त्यांची वक्तव्ये, जातीवाद आणि चातुरवर्णाबद्दल त्यांची मते काय होती ? याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिली तर दीनदयाल उपाध्याय यांची खरी ओळख आणि कार्य जनतेला कळेल असे सावंत म्हणाले.