मुख्यमंत्र्यांनी घेतला टपरीत चहा अन् खाल्ल्या शेतात शेंगा!
By Admin | Updated: September 25, 2014 00:21 IST2014-09-24T23:17:37+5:302014-09-25T00:21:36+5:30
कऱ्हाड दक्षिण : संपर्क दौऱ्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

मुख्यमंत्र्यांनी घेतला टपरीत चहा अन् खाल्ल्या शेतात शेंगा!
कऱ्हाड : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची ‘स्वारी’ आज कोळे परिसरातील मतदारांच्या ‘दारी’ पोहोचली़ या संपर्क दौऱ्यात त्यांनी पत्रकारांच्या विनंतीला मान देत त्यांनी एका चहाच्या टपरीतच पत्रकार परिषद घेतली़ पत्रकारांबरोबर काचेच्या ग्लासमधून त्यांनी चहाचे घोटही घेतले़ तर आंबवडेत शेतात काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधताना त्यांनी ओल्या शेंगाही खाल्ल्या़
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिणमधून अजूनही अधिकृत उमेदवारीची घोषणा केली नसली तरी कोळेवाडी येथील गणेश मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी बुधवारी प्रचाराला सुरूवात केली, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही़
सकाळी साडेदहा वाजता कऱ्हाडला येणारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची स्वारी साडेअकरा वाजता विमानतळावर पोहोचली़ तेथून त्यांच्या गाड्यांचा ताफा थेट कोळेवाडी येथील गणेश मंदिरात पोहोचला़ तेथे मुख्यमंत्री चव्हाण यांनी दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांनी आज प्रचार शुभारंभच केलात काय? असा सवाल केला़ त्यावर त्यांनी मी भागातल्या लोकांना भेटायला चाललोय, असे मिश्किल उत्तर दिले़ बामणवाडी, तारूख, कुसूर, कोळेवाडी, किरपे, आणे, पोतले, येणके, चचेगाव, येरवळे, विंग यासह प्रत्येक गावात जाऊन मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधला़ गावोगावी रांगोळ्या घालून, फटाक्यांची आतषबाजी करीत ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले़ तर महिलांनी त्यांचे औक्षण केले़ प्रत्येक गावात आपल्या माध्यमातून किती निधी मिळाला, किती कामे पूर्ण झाली, किती सुरू आहेत आणि कोणती प्रलंबित आहेत याची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली़
आंबवडे येथे ग्रामस्थांशी चर्चा करून कोळ्याकडे निघाले असता शेतात काही महिला भुईमुगाच्या शेंगा काढत होत्या़ मुख्यमंत्री चव्हाणांनी गाडी थांबवायला लावली अन् शेतात जाऊन महिलांशी संवाद साधला़ महिलांनी दिलेल्या ओल्या शेंगा खात मुख्यमंत्री गाडीत बसले़ त्यावेळी शेतकरी महिलांनी आणखी ओंजळभरून शेंगा दिल्या़ कोेळे येथे महेश कल्याणी यांच्या घरी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली़ त्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांना पत्रकारांनी आम्हालाही थोडा वेळ द्या, असा आग्रह धरला. त्यावेळी कुठे बोलायचं, असं त्यांनी विचारलं अन् एका चहाच्या टपरीत बाकड्यावर बसून त्यांनी पत्रकार परिषद घेतली़ पाणी संपताच टपरीवाले रत्नाकर कुंभार काचेच्या ग्लासातून चहा घेऊन आले़ मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यांचा मान राखत एक घोट चहा घेतला़ चहा छान आहे, अशी दादही मुख्यमंत्र्यांनी दिली़ तेव्हा कुंभार यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता़ (प्रतिनिधी)
ग्लासातला चहा पित पत्रकार परिषद
संपर्क दौऱ्यात त्यांनी पत्रकारांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्र्यांनी एका चहाच्या टपरीतच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कुसूर येथे गेल्यावर एका वयोवृद्ध देशमुख नावाच्या आजिबार्इंनी हार घालून त्यांचे स्वागत केले़ त्यावेळी मुख्यमंत्री बाबांनीही त्यांची आस्थेने चौकशी केली़ त्यावेळी उपस्थित सर्वच महिला भारावून गेल्या होत्या़