मुख्यमंत्र्यांमुळे अडला निधी?
By Admin | Updated: October 20, 2016 03:44 IST2016-10-20T03:44:13+5:302016-10-20T03:44:13+5:30
अर्थसंकल्पातील तरतुदींना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने पालिकेने साहित्य संमेलनासाठी तरतूद केलेला ५० लाखांचा निधीही अडकून पडला आहे,

मुख्यमंत्र्यांमुळे अडला निधी?
कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या अर्थसंकल्पातील तरतुदींना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने पालिकेने साहित्य संमेलनासाठी तरतूद केलेला ५० लाखांचा निधीही अडकून पडला आहे, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. ही स्थगिती लवकरच उठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, निधी अडकण्यास भाजपा जबाबदार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सुचवले. त्याचवेळी २७ गावांच्या राजकारणात शिवसेनेला विरोध करणाऱ्यांचाही वचपा काढल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी तर पुढे पाऊल टाकत महापौरांना स्वागताध्यक्षपद दिले नसेल, तर पालिकेने संमेलनाला निधीच देऊ नये, अशी भूमिका घेत वादात तेल टाकले आहे.
साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी बुधवारी महापौर देवळेकर आणि आयुक्त ई. रवींद्रन यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यात त्यांनी संमेलनासाठी पालिकेचा निधी लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागताध्यक्ष झाल्यानंतर वझे यांनी प्रथमच या भेटी घेतल्या. संमेलन ज्या ठिकाणी होणार आहे, त्या डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाची लवकरच पाहणी करावी. आढावा घ्यावा आणि तेथील गैरसोयी दूर कराव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या चर्चेनंतर वझे यांनी महापौर देवळेकरांची भेट घेतली. तेव्हा मनसेचे गटनेते मंदार हळबे, काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे आणि शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>राजकारण आले आड
२७ गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघर्ष समितीत गुलाब वझे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्या समितीचे शिवसेनेशी पटलेले नाही. निवडणुकीच्या काळात ती समिती भाजपासोबत होती. आताही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण त्यांना मदत करत असल्याची चर्चा आहे. स्वागताध्यक्षपदाचा मान प्रथम नागरिक या नात्याने महापौरांना मिळावा, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होते.मात्र, संमेलनाला राजकीय स्वरूप येऊ नये, यासाठी आगरी युथ फोरमने ते पद आपल्याकडे ठेवले. त्यामुळे महापौर नाराज आहेत. त्यातही संमेलनाचे स्थळ ठरवताना महापौर कल्याणच्या बैठकीला हजर होते, पण त्यांनी डोंबिवलीचे प्रतिनिधित्व न केल्याने त्यांच्यावर तेव्हा साहित्यवर्तुळातून टीका झाली होती.
या राजकारणाचा फटका संमेलनाला बसतो आहे. त्यातही भाजपाच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रस्तावांना स्थगिती दिली आहे. साहित्य संमेलनाच्या निधीसह सर्व प्रस्ताव उद्याच्या महासभेत येणार आहेत. ते महापौर मंजूर करून घेऊ शकतात. उरलेले प्रस्ताव त्यांनी अडवून ठेवू नयेत आणि मुख्यमंत्र्यांवर खापर फोडू नये, अशी भाजपाची भूमिका आहे.