मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : भालचंद्र कांगो

By Admin | Updated: February 23, 2015 00:46 IST2015-02-23T00:46:06+5:302015-02-23T00:46:50+5:30

सामाजिक अत्याचार प्रतिबंध चळवळीतर्फे मुंबईत ११ मार्चला मोर्चा, डाव्या पक्षांच्या निर्णयानुसार धर्मांध व प्रतिगामी शक्तींना रोखण्याचा संकल्पदिन येत्या आठवड्यात करणे,

Chief Minister should resign: Bhalchandra Congo | मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : भालचंद्र कांगो

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : भालचंद्र कांगो

कोल्हापूर : नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात अपयश ठरलेल्या तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मागणारे देंवेद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून आता राजीनामा द्यावा, अशी मागणी भाकपचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी रविवारी येथे केली. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील जनतेने जो उत्स्फूर्त बंद पाळला, त्याचे भान मुख्यमंत्र्यांनी ठेवावे, असे खडेबोलही त्यांनी सुनावले. भाकपच्या २२ व्या त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनातील ठरावाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. कांगो म्हणाले, पानसरेंच्या हल्ल्याला आठवडा झाला, तरी मारेकरी शोधण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री व्यवस्था सुधारण्याची भाषा करत आहेत, मग ही जबाबदारी कुणाची आहे, याचा खुलासा त्यांनी करावा. मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या बक्षिसाबाबत ते म्हणाले, पोलिसांची ही कृती म्हणजे त्यांच्या हाती काही लागत नसल्याची जाहीर कबुली आहे. ‘आयबी’ला जर कोल्हापूर टार्गेट असल्याची माहिती होती, तर शासनाने याबाबत काय कारवाई केली, याची माहिती जनतेला दिली पाहिजे. पानसरे यांच्या हत्येमागील ‘मास्टरमार्इंड’वर कारवाई करावी. २ मार्चला तालुकानिहाय निदर्शने व सत्याग्रहे, सामाजिक अत्याचार प्रतिबंध चळवळीतर्फे मुंबईत ११ मार्चला मोर्चा, डाव्या पक्षांच्या निर्णयानुसार धर्मांध व प्रतिगामी शक्तींना रोखण्याचा संकल्पदिन येत्या आठवड्यात करणे, पानसरेंलिखित ‘शिवाजी कोण होता?’, ‘राजर्षी शाहू वसा आणि वारसा’, ‘मुस्लिमांचे लाड’, ‘मार्क्सवादाची तोंडओळख’, ‘द्विवर्ण शिक्षणपद्धती’ या पुस्तकांच्या प्रत्येकी दहा हजार प्रतींची विक्री आदी ठराव या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केले आहेत, अशी माहितीही कांगो यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister should resign: Bhalchandra Congo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.