मुख्यमंत्रिपद शिवसेना सोडणार नाही
By Admin | Updated: May 21, 2014 04:08 IST2014-05-21T04:08:51+5:302014-05-21T04:08:51+5:30
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल.

मुख्यमंत्रिपद शिवसेना सोडणार नाही
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडीधर्म पाळला आता भाजपाने राज्यात तो पाळावा, असे परखड मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले. ते पत्रपरिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा जास्त जागा लढते आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना अधिक जागा लढते. हेच सूत्र या वेळी कायम राहील. विधानसभेच्या जागा कमी करून भाजपाला देण्याचा प्रश्न नाही. इतर मित्रपक्षांना (स्वाभिमानी, रिपाइं आदी) किती जागा द्यायच्या याचा निर्णय सगळे बसून करू, असे उद्धव यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, का होऊ नये, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. मुख्यमंत्री स्वत: बनणार का, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. एनडीएचे संयोजक होण्याची आपली इच्छा नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक घेण्याची मागणी भाजपाने केली असली तरी उद्धव यांनी त्यास संपूर्ण सहमती दर्शविली नाही. पावसाळा तोंडावर आहे, शेतीची कामे आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यातील नेतृत्व तीन महिन्यांसाठी बदलून असे काय होणार आहे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे याला आपला पाठिंबा आहे, असे ते एका प्रश्नात म्हणाले. मोदी पंतप्रधानपदी आरूढ होताच महायुतीचे खासदार त्यांना भेटतील. गारपीटग्रस्तांना तातडीने मदत देण्याची आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची तसेच गारपीटग्रस्त शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी करतील, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे लचके तोडू देणार नाही मोदी सरकारमध्ये एक वर्षात स्वतंत्र विदर्भ होईल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला असतानाच उद्धव यांनी, ‘महाराष्ट्राचे लचके कोणालाही तोडू देणार नाही.’ या शब्दांत आज विदर्भ राज्य निर्मितीला जोरदार विरोध केला. (विशेष प्रतिनिधी)