मुख्यमंत्री परतताच अधिकारी बारमध्ये!

By Admin | Updated: September 4, 2015 01:41 IST2015-09-04T01:41:32+5:302015-09-04T01:41:32+5:30

दुष्काळी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गुरुवारी दुपारी जिल्ह्याबाहेर पडताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी थकवा दूर करण्यासाठी आपली वाहने थेट बीअर बारकडे वळविली.

Chief Minister returned in the official bar! | मुख्यमंत्री परतताच अधिकारी बारमध्ये!

मुख्यमंत्री परतताच अधिकारी बारमध्ये!

संजय तिपाल, बीड
दुष्काळी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गुरुवारी दुपारी जिल्ह्याबाहेर पडताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी थकवा दूर करण्यासाठी आपली वाहने थेट बीअर बारकडे वळविली. मात्र कोरड्या दुष्काळावरील ‘ओली पार्टी’ सुरू होण्यापूर्वीच ‘लोकमत’ प्रतिनिधी आणि छायाचित्रकार तिथे पोहोचल्याने अधिकाऱ्यांनी धूम ठोकली!
गुरुवारी सकाळी बीडजवळील चारा छावणीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री पात्रूड (ता. माजलगाव) येथे गेले. तेथे चारा छावणीची पाहणी करून ते परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ झाले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा सोडताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या बीअर बारकडे वळल्या. बीड येथील उपअभियंता सतीश दंडे, उस्मानाबाद येथील अधीक्षक अभियंता कातकडे यांच्यासह इतर ६ अधिकारी दोन शासकीय वाहनांमधून (क्र. एमएच २४ डी - ७५५५) व (एमएच २३ - एएफ - १०८) वडवणीजवळील एका बारमध्ये शिरले. या वेळी कातकडे यांनी चालकांना ‘आपण सीएमच्या दौऱ्यात आहोत, झंझट नको, गाड्या जरा दूर उभ्या करा’ असे आदेश सोडले. त्यानंतर चालकांनी वाहने बारजवळील एका शेतात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी रस्त्यालगतच्या गवतामुळे चालकाला खड्डा दिसला नाही. जीप वळविताना मागील एक चाक या खड्ड्यात अडकले. तोपर्यंत अधिकाऱ्यांचा जत्था बारमध्ये जावून बसला होता. पसंतीनुसार वेटरला मेन्यूची आॅर्डर सुटली. पार्टी सुरू व्हायला अवकाश तेवढ्यात, पत्रकार आले आहेत, असे चालकाने फोनवरुन सांगताच अधिकारी लगबगीने बारमधून बाहेर पडले.

........................
दंडे म्हणतात...मीडिया मला नवा नाही
बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता सतीश दंडे यांनी घडल्या प्रकाराचे समर्थनच केले. ते ‘ म्हणाले, पत्रकारांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. बारमध्ये थांबलो म्हणून काय झाले? मला मीडिया नवीन नाही!

अधिकारी अक्षरश: रस्त्याने पळत होते. चालकाने जीप अर्धा किमी अंतरापर्यंत पुढे नेली होती. अधिकाऱ्यांनी तेवढे अंतर पायी कापून कशीबशी जीप गाठली. घाम पुसत त्यांनी जीपमधून वडवणी गाठले.

म्हणे, आमचा स्पेशल दौरा!
उस्मानाबाद येथील अधीक्षक अभियंता कातकडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आमचा स्पेशल दौरा होता. त्यासाठी बीडला आलो होतो. बारमध्ये आम्हाला थांबायचेच नव्हते. आम्ही तर साध्या हॉटेलात नाष्ता केला आहे.

चहा-पाण्यावर भागवले
जीप खड्ड्यात अडकल्याने हिरमोड झालेल्या अधिकाऱ्यांनी गाडी बसस्थानकाजवळील एका साध्या हॉटेलसमोर उभी केली. दुसरीकडे दुपारपासून त्यांच्या दिमतीला असलेले दंडे यांना अधीक्षक अभियंता कातकडेंनी खडेबोल सुनावले. त्यामुळे दंडे वडवणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन बसले. कातकडे व त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी केवळ चहापाणी घेऊन वडवणी सोडले.

Web Title: Chief Minister returned in the official bar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.