वैद्यकीय महाविद्यालयाला अडथळा : हा लोकसभेतील पराभवाचा सूडचंद्रपूर : चंद्रपुरातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्रीच आडकाठी घालत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी दिलेल्या उमेदवाराचा अडीच लाखांच्या फरकाने पराभव झाल्याचा सूड ते जनतेवर आणि आपल्यावर उगवित असल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला.चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी लांबणीवर पडली आहे. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या चमूने अलिकडेच तीन कारणांवरून या महाविद्यालयाची मान्यत रोखली. या संदर्भात ते म्हणाले, या मागे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करणीभूत आहेत. १५ जूनला चमूने चंद्रपुरात येवून पहाणी केली होती. त्यात तीन त्रुट्या काढल्या. त्यावर २ जुलैपर्यंत राज्य शासनाकडून अहवाल जाणे अपेक्षित होते. १५ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणे शक्य आहे. मात्र त्यात मुख्यमंत्र्यांचा अडथळा आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मीतीची मागणी आपणच रेटली होती. त्यामुळे हा आपणास जाणिवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार आहे. एवढेच नाही तर, लोकसभेतील पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवामुळे येथील मतदारांनाही ते वेठीस धरत आहेत.१५ जूनला चंद्रपुरात मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची चमू आली असता, तीन त्रुट्या दाखविण्यात आल्या. वैद्यकीय महाविद्याल सुरू करण्यासाठी २ जुलैपर्यंत त्या पूर्ण करायला हव्या होत्या. मात्र राज्य सरकार त्यात चालढकल करीत आहे. गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी तेथील महिला व बाल रूग्णालयाच्या इमारतीच्या हस्तांतरणासाठी एमओयृू करण्यात आला. तीच स्थिती येथे असताना चंद्रपुरातील विषय मात्र थंड बस्त्यात टाकण्यात आला. यामागे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकीय द्वेष असल्याचा आरोप त्यांनी केला.या संदर्भात मुख्यमंत्री चव्हाण आणि आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना आपण पत्र लिहिले असून यात हस्तक्षेप करण्याची विनंतीही केल्याची माहिती त्यांनी दिली. राहुल पुगलिया यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात ३० जूनलाच जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव, मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे सचिव तसेच केंद्र सरकारच्या मुख्य सचिवांना प्रतिवादी बनविण्यात आले आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
नरेश पुगलियांचा मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर
By admin | Updated: July 2, 2014 00:50 IST