जैन पर्यूषण सिद्धितप पारण्याला मुख्यमंत्री उपस्थित

By Admin | Updated: September 8, 2016 06:00 IST2016-09-08T06:00:56+5:302016-09-08T06:00:56+5:30

‘पर्यूषण पर्वात उपवास आणि अहिंसेला मोठे महत्त्व आहे. ज्यांनी उपवास केले, अशा तपस्वींच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ मला याच काळात मिळाला

Chief Minister of Jain Pariyusha Siddhitap Purna | जैन पर्यूषण सिद्धितप पारण्याला मुख्यमंत्री उपस्थित

जैन पर्यूषण सिद्धितप पारण्याला मुख्यमंत्री उपस्थित

ठाणे : ‘पर्यूषण पर्वात उपवास आणि अहिंसेला मोठे महत्त्व आहे. ज्यांनी उपवास केले, अशा तपस्वींच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ मला याच काळात मिळाला, हे माझे भाग्य आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ठाण्याच्या सिंघानिया स्कूल येथे मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सकाळी जैन पर्यूषण सिद्धितप पारण्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. उपवास केलेल्या जैनबांधवांची भेट घेतली. राजस्थानमधून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या श्रीयशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांचे आशीर्वादही घेतले.
उपवास केलेल्या जैनबंधू आणि भगिनींना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, ‘जैन धर्मात ‘मिच्छामि-दुक्कडम’ असे म्हणून क्षमा मागितली जाते. अशा या पवित्र पर्वात क्षमा करण्यास खूप महत्त्व आहे. कळत-नकळत माझ्याकडून कुणाचेही मन दुखावले गेले असेल, तर मी त्या सगळ्यांची क्षमा मागतो,’ असे सांगत त्यांनीही क्षमायाचना केली.
‘या ऐतिहासिक उपवाससमाप्तीच्या निमित्ताने मला एका चांगल्या कार्यासाठी यायला मिळाले, याचा आनंद आहे. मनुष्य स्वत: आपल्या कर्माला जबाबदार असतो. त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या चुकांच्या निवारणासाठी प्रार्थना करणे, त्याबद्दल क्षमा मागणे आवश्यक आहे. आमच्या गुरूंनी कठीण तप करून महान मानवी मूल्यांचा अंगीकार केला आहे. त्याची शिकवण समस्त मानवजातीला दिली. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमचे काम आणखी चांगल्या पद्धतीने करू,’ अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
(प्रतिनिधी)


आपल्या आशीर्वादपर भाषणात श्रीयशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा केली. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. तेथे मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत. सर्व प्रजा अहिंसक आणि निर्व्यसनी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मोबाइल आणि इंटरनेटच्या जमान्यातही जैन समाजातील तरु ण आपले संस्कार विसरलेले नाहीत, ही अतिशय चांगली आणि उत्साहवर्धक बाब आहे. याच पद्धतीने आपल्या पुढच्या पिढीने संस्कारी बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या वेळी महाराजांनी मुख्यमंत्र्यांना एक पुस्तकही भेट दिले. आयोजक श्रीऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्टतर्फे मुख्यमंत्र्यांचा मंगलतिलक लावून सन्मान करण्यात आला. तेव्हा आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते.
श्रीपद्मयश सुरीश्वरजी महाराज, श्रीवीरयश सुरीश्वरजी महाराज यांनीही या वेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना आशीर्वाद दिले.

Web Title: Chief Minister of Jain Pariyusha Siddhitap Purna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.