मुंबई : राज्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ६ दिवसांत २२ जिल्ह्यातील तब्बल २७,४४९ लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी संवाद सेतूच्या (आॅडिओ ब्रीज) माध्यमातून संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.या माध्यमातून १३९ तालुक्यांपर्यंत मुख्यमंत्र्यांना पोहोचता आले. एकूण २२ जिल्ह्यांतील हे तालुके आहेत. त्यात औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणी, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, धुळे, बुलढाणा, जळगाव, सातारा, पुणे, सांगली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, वाशीमचा समावेश आहे. या संवादसेतूमध्ये मुख्यमंत्री जेव्हा प्रत्यक्ष सरपंचांशी संवाद साधत, तेव्हा राज्याचे मुख्य सचिव, दुष्काळी उपाययोजनांशी संबंधित खात्यांचे प्रधान सचिव इत्यादी अधिकारी मुंबईला हजर राहत आणि जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, ग्रामसेवक हे सारे त्या कॉलवर उपलब्ध असायचे. अनेक ठिकाणी पालक सचिवांनीसुद्धा त्या-त्या जिल्ह्यातून या आढाव्यात हजेरी लावली.ज्यांना या संवादात सहभागी होता आले नाही, त्यांच्यासाठी विविध व्हॉटसअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. या २२ जिल्ह्यांना एकूण १७ व्हॉटसअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले होते. या व्हॉटसअॅपच्या माध्यमातून सुमारे ४४५१ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील प्रत्यक्ष दुष्काळाशी संबंधित २३५९ तक्रारी होत्या. मुख्यमंत्री कार्यालयात या प्रत्येक तक्रारीच्या निवारणासाठी पाठपुरावा करण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.
राज्यातील २७ हजार लोकप्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 05:05 IST