मुख्यमंत्र्यांनी अपुरी माहिती दिली -राणे
By Admin | Updated: July 23, 2016 02:24 IST2016-07-23T02:24:17+5:302016-07-23T02:24:17+5:30
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबत विधान परिषदेत सुरू असलेल्या गंभीर चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयाला बगल दिली

मुख्यमंत्र्यांनी अपुरी माहिती दिली -राणे
मुंबई : नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबत विधान परिषदेत सुरू असलेल्या गंभीर चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयाला बगल दिली. कोपर्डी घटनेबाबत त्यांनी चकार शब्द काढला नाही. शिवाय सिंधूदुर्गातील गुन्ह्यांची आणि कलमांची मुख्यमंत्र्यांनी अपुरी माहिती सभागृहासमोर ठेवल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केला.
कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना बुधवारी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राणेंचा खरपूस समाचार घेतला होता. त्याचा संदर्भ देत राणे यांनी गुरुवारी नियम ४७ अन्वये स्वत:ची बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात तब्बल २५ वेळा माझे नाव घेतले, मात्र माहिती अपुरी दिली. सिंधुदुर्गातील गुन्हे, कलमे वाचली; पण ती कोणावर लागली, कशासाठी लागली याची माहिती कोण देणार, असा सवाल राणे यांनी केला. शिवसेनेच्या स्थापनेपासून राजकारणात आहे. आंदोलने केली त्यामुळे पोलिसांचा नेहमी संबंध असल्याचा खुलासाही राणे यांनी केला.
राणे यांच्या निवेदनावर वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी आक्षेप घेतला. मात्र सभापती रामराजे निंबाळकर यांनी राणे यांना आपल्या अधिकारात बोलण्यास परवानगी दिली असल्याचे सांगत मंत्रीद्वयांना खाली बसवले. (प्रतिनिधी)