शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची कबुली
By Admin | Updated: March 17, 2016 14:55 IST2016-03-17T14:33:13+5:302016-03-17T14:55:00+5:30
शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिली असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे

शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची कबुली
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १७ - शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिली असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
शेतक-यांच्या आत्महत्येवर कर्जमाफी हा उपाय नाही. कर्जमाफीने मतं मिळतील मात्र समस्या सुटणार नाहीत. कर्जमाफी हा रामबाण उपाय नाही, कर्जमाफीनंतरही शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
शेतक-यांच्या कर्जाचं पुनर्गठन करणार आहोत. यावर्षी सिंचन विहीरींच टार्गेट पुर्ण होईल, वर्षभरात 33 हजार सिंचन विहीरी पुर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा विकासदर देशापेक्षा जास्त आहे. शेतक-यांशिवाय मेक इन महाराष्ट्र होणार नाही. मेक इन महाराष्ट्रामध्ये शेतमालाचा विचार केला आहे. तसंच नवी मुंबई विमानतळ आणि अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ट्रस्ट तयार करण्याचं काम सुरु असून ट्रस्टचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
शिवाजी महाराजांचं स्मारक 40 महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे. तसंच ठाण्यात लवकरच मेट्रो सुरु करणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाचं काम आमच्या सरकारने केलं असून सरकारची भुमिका स्पष्ट आहे. न्यायालयात निकाल आपल्या बाजून लागेल असा विश्वास आहे. मराठा आरक्षणासाठी विरोधकांची भुमिका सकारात्मक आहे, तर मग त्यांनी राजकारण करु नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.