महापूजेनंतर पंढरपूरच्या विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 05:21 AM2023-06-29T05:21:13+5:302023-06-29T05:21:35+5:30
Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पंढरपूरचा विकास आराखडा तसेच इतर विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं.
आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे विठुरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पंढरपूरचा विकास आराखडा तसेच इतर विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं. पंढरपूरचा विकास आराखडा कोणालाही डावलून पुढे नेला जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय होईल. सर्वांचा विचार करून प्रकल्प पुढे नेले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, इथे आल्यावर माझ्याकडे विचारणा झाली की, पंढरपूरच्या विकास आराखड्याचं काय, असा प्रश्न विचारण्यात आला. मी स्पष्टपणे सांगतो की, पंढरपूरचा विकास आराखडा कोणालाही डावलून पुढे करणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय होईल. सर्वांचा विचार करून प्रकल्प पुढे नेले जातील. पंढरपूर विकास आराखडा बनवताना कोणाची नाराजी राहणार नाही यासाठी सरकार प्रयत्नशील असेल.
यावेळी सरकारला झालेली वर्षपूर्ती आणि सरकारकडून घेतले जात असलेले निर्णय यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. मध्ये काही अडचणी आल्या. मात्र पांडुरंगाच्या कृपेने सर्व काम सुरळीत सुरू आहे. आमच्याकडून विविध शासकीय निर्णय घेतले जाताहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत यापुढे दीड लाखांची मर्यादा आता पाच लाखाची आजच्या मंत्रिमंडळात ऐतिहासिक निर्णय घेतला. १५ लाख वारकऱ्यांचा एक लाखाचा विमा काढला. सरकार म्हणून हे आमचं कर्तव्य आहे. गेल्या अडीच वर्षाची काम रखडली होती ती आता पुढे सुरू झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी सहावा वेतन आयोग केला. याचा जीआर आज मी सोबत आणलाय. आता चांगलं काम करा, चांगली सेवा करा, विठुरायाच्या कृपेनेच झालंय. आम्ही निमित्त मात्र आहोत. पंढरपूरच्या रस्त्यासाठी १०८ कोटी मान्यता दिली आहे. तसेच पंढरपूरसाठी १०९ कोटींच्या पाणी पुरवठ्याला मान्यता दिली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.