CM Devendra Fadnavis : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आज(दि.5) अखेर महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, या शपथविधीनंतर फडणवीसांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारची पुढील रुपरेषा कशी असेल, यासह लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण, जातनिहाय जनगणना आणि शक्तीपीठ महामार्गसारख्या विविध विषयांवर भाष्य केले.
'मराठा समाजाला न्याय देणार...'यावेळी फडणवीसांना मराठा आरक्षणाबाबत विचारण्यात आले. याववर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'मी राज्याच्या विधानसभेत यापूर्वीच वस्तुस्थिती मांडली होती. आधीच्या सरकारने डेटा मिळत नाही, अशाप्रकारचा अहवाल केंद्राला पाठवला होता. मधल्या काळातही बरीच कारवाई झाली, कोर्टात सपोर्टिव्ह अॅफिडेव्हीट आम्ही केले. सध्या हे प्रकरण कोर्टात विचाराधीन आहे. आम्ही आमची बाजू स्पष्टपणे मांडली आहे. मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या सरकारमध्ये आम्हीच केला होता आणि पुढेही आम्हीच मराठा समाजाला न्याय देवू,' अशी स्पष्टोक्ती फडणवीसांनी दिली.
'जातनिहाय जनगणनेला विरोध नाही, पण...'यावेळी मुख्यमंत्र्यांना जातनिहाय जनगणनेबाबतही विचारण्यात आले. त्यावर ते म्हणातात, 'जातनिहाय जनगणनेला आमचा विरोध नाही, हे आम्ही वारंवार सांगितले आहे. पहिली जातनिहाय जनगणना बिहारमध्ये आमच्या समर्थनानेच झाली होती. आमचे म्हणने इतकेच आहे की, जातनिहाय जनगणनेला राजकीय फायद्यासाठी हत्यार बनवू नका. जातनिहाय जनगणनेचा शस्त्र म्हणून वापर केला, तर अतिशय लहान-लहान समाजांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे जनगणना करण्यापूर्वी, त्यातून आपल्याला काय हवंय? हे आधी जाणून घेतले पाहिजे आणि त्यानंतर केली पाहिजे. या गोष्टीला राजकीय हत्यार बनवण्याचा प्रयत्न केला, तर समाजात फूट पडेल,' असे थेट भाष्य फडवणीसांनी केले.
लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?'लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. ही योजना पुढेदेखील सुरूच ठेवली जाईल. लाडक्या बहिणींना 2100 रुपयेही देणार आहोत. जी आश्वासने दिली आहेत, ती आश्वासने पूर्ण करणार आहोत. पडताळणीचा जोपर्यंत प्रश्न आहे, त्यात इतकेच आहे की, निकषांबाहेर जर कुणी घेतले असेल किंवा काही तक्रारी आल्या आहेत, त्यावर आमचे लक्ष असेल. पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा शेतकऱ्यांसाठी योजना आणली, त्यावेळी सुरुवातीच्या काळात काही निकषाबाहेरच्या शेतकऱ्यांनाही त्या योजनेचा लाभ मिळाला होता. नंतर या शेतकऱ्यांनी स्वतःहूनच ते निकषाबाहेरील असून त्यांना योजनेची गरज नाही, हे स्पष्ट केले आणि मग अंतिम छाननी करून ती योजना स्थिर करण्यात आली. तशाच पद्धतीने आतादेखील महत्त्वाच्या गोष्टींची चाचपणी केली जाईल. लाडकी बहिणी योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याची महायुती सरकारची अजिबातच मानसिकता नाही. ही योजना सुरुच राहिल,' असा पुनरुच्चार फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?यावेळी फडणवीसांनी विधानसभा अध्यक्ष आणि मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'मुंबईच्या विशेष अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. तसेच ही निवड झाल्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण व्हावे लागते. त्यामुळे 7,8 आणि 9 डिसेंबर रोजी आमदारांचे शपथविधी होतील. 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल आणि 9 तारखेलाच राज्यपालांनी अभिभाषण करावे, असे निवेदन मंत्रिमंडळाने राज्यपालांना पाठवले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराचा जो प्रश्न आहे, तो आम्ही बऱ्यापैकी पुढे गेलो आहोत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.