मुख्यमंत्री दीक्षांत समारंभाचे मुख्य अतिथी

By Admin | Updated: January 21, 2015 00:23 IST2015-01-21T00:23:06+5:302015-01-21T00:23:06+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून कुणाला बोलविण्यात येणार

Chief guest of CM convocation ceremony | मुख्यमंत्री दीक्षांत समारंभाचे मुख्य अतिथी

मुख्यमंत्री दीक्षांत समारंभाचे मुख्य अतिथी

नागपूर विद्यापीठ : सी.एन.आर.राव, कैलाश सत्यार्थींच्या नावाचा विचार नाही
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून कुणाला बोलविण्यात येणार याबाबत विद्यापीठ वर्तुळात उत्सुकता होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम झाले असून त्यांनीदेखील याकरिता होकार दिला आहे. दरम्यान सुप्रसिद्ध वैज्ञानिक व भारतरत्न पुरस्कारप्राप्त सी.एन.आर.राव किंवा नोबेल शांती पुरस्कार विजेते समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांना अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले व राज्यपाल कार्यालयाकडून या तारखेला मंजुरी देण्यात आली. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मुख्य अतिथी म्हणून कुणाला आमंत्रित करायचे यासंदर्भात चर्चा झाली. या समारंभाला शैक्षणिक व्यक्तीच मुख्य अतिथी म्हणून बोलविण्यात यावी, असा सदस्यांचा सूर दिसून आला. यावेळी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील निरनिराळ्या व्यक्तींची नावे सदस्यांकडून सुचविण्यात आली. यात भारतरत्न सी.एन.आर.राव तसेच कैलाश सत्यार्थी यांच्या नावांवर भर देण्यात आला.
या दोघाही मान्यवरांना संपर्क करून निमंत्रण देण्यासंदर्भात विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होकार देण्यात आला. त्यामुळे त्यांच्याच नावावर अधिकाऱ्यांचे एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांना इतका वेळ देणे शक्य होईल की नाही ही बाब लक्षात घेता शिक्षक किंवा सामाजिक क्षेत्रातील नामांकित व्यक्तीला निमंत्रित करण्याचा विचार होता. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी वेळ देण्याचे मान्य केल्यामुळे इतर नावांचा विचार न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री देणार अडीच तास
साधारणत: दीक्षांत समारंभ हा अडीच ते तीन तास चालतो. मुख्यमंत्र्यांचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता त्यांना इतका वेळ देणे शक्य होईल की नाही हा विद्यापीठातील अधिकाऱ्यांना प्रश्न पडला होता. परंतु मुख्यमंत्री विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला थोडेथोडके नव्हे तर अडीच तास उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Chief guest of CM convocation ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.