मुंबई - छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले हे त्यांच्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या ३० वर्षापासून घोडेले शिवसेनेत कार्यरत आहेत. पक्षातील फुटीनंतर घोडेले यांनी उद्धव ठाकरेंची साथ कायम ठेवली परंतु आता ते शिंदेंच्या नेतृत्वात धनुष्यबाण हाती धरणार आहेत.
याबाबत माजी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, जवळपास ३० वर्षापासून आम्ही शिवसेनेत काम करत आहोत. मागील अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यात जे काम सुरू आहे. राज्याला विकासाच्या मार्गापथावर नेण्याचं काम त्यांनी केले आहे. त्यांच्या कामाला प्रेरित होऊन आज माझी पत्नी अनिता घोडेले, मी स्वत: मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत भेट घेऊन पक्षप्रवेश करत आहोत असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय हिंदुत्ववादी भूमिका आपण सोडायला नको होती. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत झालेली युती लोकांना पटली नाही. त्याचा फटका निवडणुकीत बसला आहे. भविष्यात जर लोकांची कामे करायची असतील तर सत्तेसोबत आणि सत्ताधारी लोकांसोबत असलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे असंही नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
दरम्यान, नंदकुमार घोडेले आणि त्यांच्या पत्नीला पक्षाने महापौरपद दिले होते. अडीच वर्ष महापौरपदाच्या कारकिर्दीत काही काम केले नाही. दुसऱ्याला पद न देता दिले ही चूक झाली का, स्वार्थासाठी ते आले आणि स्वार्थासाठी ते गेले. शिंदे गटात जे कार्यकर्ते गेलेत ते गप्प बसणार आहेत का..? आज उद्धव ठाकरेंसोबत असताना जो काही मानसन्मान मिळत होता तो यापुढे लोकांकडून मिळणार नाही. कालपर्यंत आमच्यासोबत होते. तू सुरुवातीला गरीब होता. महापालिकेचे कंत्राटदार म्हणून काम करायचा. पहिल्या निवडणुकीत आम्ही मदत केली. संघटनेसोबत काम करायचे असेल संघर्ष करावा लागतो. आज घोडेले यांनी आयुष्यातील मोठी घोडचूक केली आहे असा टोला माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला.