छगन भुजबळांच्या अडचणीत आणखी वाढ
By Admin | Updated: April 2, 2017 14:47 IST2017-04-02T03:18:42+5:302017-04-02T14:47:38+5:30
मुंबईसह १६ राज्यांतील ३०० हून अधिक ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी छापे टाकले. यात मुंबईच्या अंधेरीतील एका सनदी लेखापलाकडे

छगन भुजबळांच्या अडचणीत आणखी वाढ
मुंबई : मुंबईसह १६ राज्यांतील ३०० हून अधिक ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी छापे टाकले. यात मुंबईच्या अंधेरीतील एका सनदी लेखापलाकडे (सीए) टाकलेल्या छाप्यात माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी ४६.७ कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या तुरुंगात असलेल्या भुजबळांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ईडीच्या पथकाने अंधेरीतील जगदीश नावाच्या ‘सीए’च्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यातून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. काही कंपनीचालकांसह २० बोगस संचालकांची नावेही उघड झाली आहेत. या कारवाईदरम्यान बोगस कंपन्यांनी छगन भुजबळ यांच्यासाठी तब्बल ४६.७ कोटींचा काळा पैसा पांढरा केल्याचे ईडीच्या पथकाला आढळून आले. हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांचा वापर करण्यात आल्याचे आढळले असून, आता या सर्व कंपन्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता या मोठ्या शहरांमध्ये एकाच वेळी छापे मारत, काळ्याचा पांढरा पैसा करणाऱ्या बोगस कंपन्यांभोवती कारवाईचा फास आवळला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे ३०० कंपन्या ईडीच्या रडारवर आहेत. या कंपन्यांनी शंभर कोटींहून अधिक काळा पैसा पांढरा केल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. ईडीचे अधिकारी कंपन्यांच्या कागदपत्रांची कसून तपासणी करत आहेत. सुरुवातीला या कंपन्यांची प्राथमिक चौकशी केली
होती. त्यानंतरच ईडीने कारवाईचे पुढील पाऊल उचलले आहे. काळे धन पांढरे करण्यासाठी कर्ज देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्याचे दिसून आले आहे. त्यात राजकीय नेते, उद्योजक यामध्ये अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)