छगन भुजबळांची ९ तासांपासून मॅरेथॉन चौकशी
By Admin | Updated: March 14, 2016 20:14 IST2016-03-14T19:54:31+5:302016-03-14T20:14:21+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची ९ तासापासून सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून मॅरेथॉन चौकशी सुरु आहे

छगन भुजबळांची ९ तासांपासून मॅरेथॉन चौकशी
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १४ - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची ९ तासापासून सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून मॅरेथॉन चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरु आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ सोमवारी सकाळी ११ वाजता सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील होते.
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आरोपपत्र दाखल केल्यानंतर भुजबळ यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर मुलगा आ. पंकज यांना १० फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दोघांचे पासपोर्टही ताब्यात घेण्यात आले आहेत.
सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास आपल्या वकिलासोबत ईडीच्या कार्यालयात हजर झालेल्या भुजबळांनी आपल्या सर्व बँक खात्यांची कागपत्रे तसेच त्यांनी खरेदी केलेल्या विविध मालमत्तांची कागदपत्रे घेऊन हजर झाले.
एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे २०० हून अधिक कार्यकर्ते भुजबळांना पाठिंबा देण्यासाठी ईडी कार्यालयाबाहेर जमा झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ईडीच्या कार्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.