महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळांची होणार चौकशी
By Admin | Updated: October 23, 2014 16:43 IST2014-10-23T16:43:50+5:302014-10-23T16:43:50+5:30
महाराष्ट्र सदन बांधकामात कथित झालेल्या घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची लवकरच चौकशी होणार आहे

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळांची होणार चौकशी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - दिल्लीत बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदन बांधकामात कथित झालेल्या घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची लवकरच चौकशी होणार आहे. केंद्रीय गृहखात्याने याप्रकरणी चौकशीला परवानगी दिली असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र सदन व मुंबईतील दोन सरकारी इमारतींच्या बांधकामात भुजबळ यांची नेमकी भूमिका काय होती, हे तपासले जाणार आहे. त्यामुळे भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळ यांची खुली चौकशी करण्यास काहीच हरकत नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
'महाराष्ट्र सदन'च्या कंत्राटापोटी मेसर्स चमणकर एंटरप्रायझेसला मिळालेल्या शंभर कोटी रुपयांपैकी काही रक्कम ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड व इदीन फर्निचर या दोन कंपन्यांना देण्यात आली होती. या दोन कंपन्यांवर भुजबळ व त्यांच्या नातेवाईकांचे नियंत्रण असल्याचा दावा असल्याचा आरोप आहे. १२ फेब्रुवारी, २०१० ते २० जानेवारी, २०१२ या कालावधीत ७४.१० लाख रुपये इदीन फर्निचर यांना देण्यात आले होते. त्या कंपनीचे संचालक पंकज भुजबळ यांची पत्नी विशाखा भुजबळ व समीर भुजबळ यांची पत्नी शेफाली भुजबळ आहेत. भुजबळ यांची चौकशी झाल्यास व त्यात ते दोषी सापडल्यास भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.