छगन भुजबळ पुन्हा जे.जे.त दाखल
By Admin | Updated: October 28, 2016 19:23 IST2016-10-28T19:23:22+5:302016-10-28T19:23:22+5:30
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या छगन भुजबळांना शुक्रवारी सायंकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारांसाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

छगन भुजबळ पुन्हा जे.जे.त दाखल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या छगन भुजबळांना शुक्रवारी सायंकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारांसाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी रुग्णालयात दाखल केल्यावर आजाराचे निदान करण्यासाठी तपासण्या करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
भुजबळ यांना बुधवारी आॅर्थर रोड कारागृहात अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखायला लागले होते. त्यावेळी त्यांना तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते.
त्यावेळी तपासण्या केल्यावर भुजबळांना गॅस झाला असल्याचे निदान झाले. त्यांना औषधे देऊन त्यांची रवानगी पुन्हा आॅर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा भुजबळांना अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत दुखू लागले. त्यानंतर तत्काळ त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १२ आॅक्टोबर रोजी भुजबळांना जे.जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
सप्टेंबर महिन्याच्या अखेर भुजबळांना होऊ लागलेल्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर ते २५ दिवस रुग्णालयात होते. त्यावेळी भुजबळांना ताप, अंगदुखी, डोकेदुखी असा त्रास जाणवत होता. त्यांना डेंग्यू झाला असेल अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्यांना व्हायरल फिवर होता. यावेळी त्यांच्या सांध्यांना सूज आली होती. उपचारादरम्यान भुजबळांच्या हृदयाचे ठोक कमी झाले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृती सुधारणा झाली होती. पण, पुन्हा एकदा भुजबळांची प्रकृती खालावली आहे. तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर निदान होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.