स्मशानभूमित 'विसावा'....
By Admin | Updated: July 21, 2016 16:07 IST2016-07-21T16:07:46+5:302016-07-21T16:07:46+5:30
नातेवाईक, मित्र मंडळातील सदस्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वच जण 'स्मशानभूमी'मध्ये जातात.

स्मशानभूमित 'विसावा'....
नंदकिशोर नारे/ वाशिम
नातेवाईक, मित्र मंडळातील सदस्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वच जण 'स्मशानभूमी'मध्ये जातात. परंतु वाशिम येथील स्मशानभूमी (मोक्षधाम) हे निसर्गरम्य वातावरणात, सर्वत्र झाडे झुडपे व एखादया उद्यानाला सुध्दा लाजवेल असे असल्याने येथे शहरातील नागरिक दररोज फिरण्यासाठी येतात हे विशेष!
स्मशानभूमी म्हटले की, एक ओटा व थोडीसी मोकळी जागा झाली स्मशानभूमी. वाशिम शहरात असलेले मोक्षधाम मात्र याला अपवाद असून सर्वसुविधांनी युक्त असे व निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. श्री पद्मतिर्थ स्मशानभूमी विकास प्रकल्पाच्यावतिने होत असलेली या मोक्षधामाची सोय वाखाण्याजोगी असून ते राबवित असलेले वृक्षारोपण, रक्तदान, नेत्रदानास पाण्याचे महत्वाबाबतची जनजागृती एक आदर्श ठरत आहे.
या मोक्षधाममध्ये रस्ते, येणाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था, सुशोभिकरण, पाणी पुरवठा, जागोजागी प्रकाश व्यवस्था, शोभीवंत झाडे, येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाची पार्कीग व्यवस्था, परिसर सुशोभीत करण्यासाठी गार्डनला नेहमी व्यवस्थित ठेवण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्तीसह अनेक सुविधा या मोक्षधाम मध्ये दिसून येत आहेत. या सर्व सुविधांमुळे केवळ अंत्यसंस्कारापुरतेचे हे मोक्षधाम राहिले नसून दुपारच्यावेळी, संध्याकाळच्यावेळी अनेक नागरिक येथे फिरण्यासाठी येतात.