रासायनिक संवर्धन होणारच!
By Admin | Updated: July 24, 2015 01:26 IST2015-07-24T01:26:18+5:302015-07-24T01:26:18+5:30
अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला हिंदू जनजागृती समितीने केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर खासदार

रासायनिक संवर्धन होणारच!
कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला हिंदू जनजागृती समितीने केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी पुरातत्त्व खात्याचे महासंचालक राकेश तिवारी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी तिवारी यांनी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानुसार औरंगाबादचे पुरातत्व विभागाचे पथक शुक्रवारी कोल्हापूरात दाखल होत आहे. त्यामुळे रासायनिक संवर्धनचा मार्ग मोकळा झाला आहे.
मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पुरातत्व खात्याला पाठविले होते. यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आले नव्हते. तर, मूर्तीवरील धार्मिक विधी सुरुच ठेवण्याचा निर्णय श्रीपूजकांनी घेतला होता. त्याअनुषंगाने त्यांनी संध्याकाळी खासदार महाडिक यांना रासायनिक प्रक्रियेसंबंधी आवश्यक ती कागदपत्रे मेलद्वारे पाठवून ही प्रक्रिया नियोजित वेळेत सुरू होण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार महाडिक यांनी डॉ. तिवारी यांची भेट घेतली. त्यानुसार तिवारी यांनी संवर्धन विभागाचे संचालक जन्वील शर्मा आणि विज्ञान विभागाचे संचालक सक्सेना यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. रासायनिक संवर्धन प्रक्रियेसाठी देवस्थान समितीने पुरातत्त्व खात्याच्या दिल्ली येथील कार्यालयाकडे निधी जमा केला आहे. वस्तुत: तो निधी औरंगाबाद विभागाकडे वर्ग करण्याची गरज होती. आता हा निधी शुक्रवारी वर्ग केला जाईल. संचालक शर्मा औरंगाबादचे पुरातत्त्व खात्याचे अधिकारी एम.के.सिंग यांना काम सुरू करण्याचे आदेश देतील, असेही ठरले.