रसायनमुक्त फळांची कीर्ती पोहोचली विदेशात
By Admin | Updated: August 15, 2016 01:26 IST2016-08-15T01:26:35+5:302016-08-15T01:26:35+5:30
शेतीमध्ये अनुभवातून आणि अभ्यासातून केलेला बदल फायदेशीर ठरतो.

रसायनमुक्त फळांची कीर्ती पोहोचली विदेशात
बारामती : शेतीमध्ये अनुभवातून आणि अभ्यासातून केलेला बदल फायदेशीर ठरतो. आज रासायनिक शेती, सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादनखर्च वाढला आहे. त्यामानाने मिळणारे उत्पन्न आणि मिळणारा बाजारभाव याचा विचार करता, शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे, अशी ओरड ऐकायला मिळते. मात्र यावर काही शेतकरी उपाय शोधतात, प्रवाहाच्या विरूद्ध जातात. आधुनिक शेतीशास्त्रामध्ये ज्या गोष्टी निषिद्ध मानल्या त्याला न जुमानता नैसर्गिक शेतीची वाट धरत त्यातून त्यांच्या ‘झीरो बजेट शेती’ आणि रसायनमुक्त फळांची कीर्ती विदेशामध्येदेखील पोहोचली आहे. या शेतकऱ्यांच्या शेतमालास जागरूक ग्राहक पसंती देताना दिसत आहे.
कळस (ता. इंदापूर) येथील शेतकरी शशिकांत पवार यांनी नैसर्गिक शेतीच्या सूत्रानुसार डाळिंबाची बाग वाढवली आहे. कोणत्याही प्रकारचे रासायनिक किंवा सेंद्रिय खत न वापरता त्यांच्या बागेतील फळाचे वजन ६०० ग्रॅमपर्यंत भरल्याचे त्यांनी सांगितले. १२ टन डाळिंबाचे उत्पादन त्यांनी काढले. त्यामधून त्यांना ६ लाख रुपयांचे निव्वळ उत्पादन मिळाले आहे. शशिकांत पवार हे आपल्या नैसर्गिक शेतीच्या तंत्राबद्दल सांगतात, की मातीमध्ये पिकाला पोषक असणारे सर्व घटक असतात. हे घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम फक्त आपल्याला करावे लागते. त्यासाठी देशी गाईचे शेण व गोमूत्रापासून बनवलेले जीवामृत, शेतजमिनीवर केलेले पालापाचोळ्याचे अच्छादन महत्त्वाची भूमिका बजावतात. देशी गाईच्या १ ग्रॅम शेणामध्ये ३०० कोटी पिकासाठी उपयुक्त असे अॅझेटोबॅक्टर, पीएसबी, ट्रायकोड्रमा, केएमबी प्रकारचे जीवाणू असतात.
एकदलीय वनस्पतीपासून जमिनीला कार्बन मिळते. तर द्विदलीय वनस्पती, यामध्ये डाळवर्गीय व शेंगवर्गीय पिकांपासून जमिनीला नायट्रोजनचा पुरवठा होतो. त्यामुळे शेतामध्ये मुख्य डाळिंब पिकासोबतच तूर, मूग, उडीद आदी सापळा पिकांच्या लागवडी केल्या. तसेच पिकाचे निघणारे अवशेष, गवत यांचा आच्छादन म्हणून वापर केला. त्यामुळे जमिनीतील ह्युमस वाढतो. त्या शेतामध्ये मित्रकीटकांची पैदास होते. हेच गांडूळ जमिनीतील पिकासाठी उपयुक्त असणारे घटक विष्ठेच्या रूपात पिकांच्या मुळापर्यंत आणतात. त्यामुळे पिकांना बाहेरील
खतांची गरज पडत नाही. नैसर्गिक आहार पिकाला मिळाल्याने झाडांची फळधारणा व वजनदेखील वाढले़
>रोज प्रतिलिटर ५० रुपयांनी दूध विकले जात आहे. भिगवण येथे पॅकिंग करून दूध विकले जात आहे. एक गीर गाय दिवसाला १० ते १२ लिटर दूध देत आहे. पवार यांच्याकडे अशा ६ गीर, १ कांक्रेज गाय, ५ गीर कालवडी आहेत. या गार्इंच्या तुपाला पुणे, रायगड, मुंबई भागातून चांगली मागणी आहे. तुपाला चांगला भाव येत आहे. चांगल्या बाजारभावामुळे विदेशी वंशाच्या गार्इंंपेक्षा देशी गाय अधिक उत्पन्न व शेतीला उपयुक्त असे शेण व गोमूत्र देत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च नसल्याने येणारा पैसा हे निव्वळ उत्पन्न आहे, असेही पवार यांनी सांगितले.