चेकमेट दरोडा : नाशिक येथून एक कोटी जप्त; आरोपींच्या कोठडीत १३ जुलैपर्यंत वाढ

By Admin | Updated: July 11, 2016 05:34 IST2016-07-11T05:34:11+5:302016-07-11T05:34:11+5:30

‘चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.’ या खासगी वित्त कंपनीवरील दरोड्यातील किरण साळुंखे या एकाच आरोपीच्या नाशिक येथील

Checkmate Draft: One crore seized from Nashik; Increased custody till July 13 | चेकमेट दरोडा : नाशिक येथून एक कोटी जप्त; आरोपींच्या कोठडीत १३ जुलैपर्यंत वाढ

चेकमेट दरोडा : नाशिक येथून एक कोटी जप्त; आरोपींच्या कोठडीत १३ जुलैपर्यंत वाढ

जितेेंद्र कालेकर,  ठाणे
‘चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.’ या खासगी वित्त कंपनीवरील दरोड्यातील किरण साळुंखे या एकाच आरोपीच्या नाशिक येथील एका नातेवाईकाच्या घरातून एक कोटी पाच लाख ५० हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी
नऊ कोटी ५३ लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. दरम्यान, ठाणे न्यायालयाने यातील नऊ आरोपींच्या कोठडीत १३ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळाले कोटींचे घबाड
नाशिकच्या वणी परिसरात दरोड्याचा बनाव करणाऱ्या किरण साळुंखे याच्या नाशिक येथील घरातून एक कोटी पाच लाख रुपये शनिवारी हस्तगत केले. रुग्णालयातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला आपण त्या गावचेच नसल्याचा आव त्याने आणला होता. त्याच्याकडे मिळालेल्या या रकमेमुळे हस्तगत झालेली रोकड आता नऊ कोटी ५३ लाखांच्या घरात गेली आहे.
पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या पथकाने वेगवेगळ्या आरोपींच्या घरांतून, तसेच अन्य काही ठिकाणांहून आठ कोटी ४८ लाखांच्या घरात रोकड हस्तगत केली होती. दरोडा पडला, त्या वेळी एकूण नऊ कोटी १६ लाख रुपये लुटले गेल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, या रकमेपेक्षा जास्त रक्कम लुटली गेल्याची शक्यता व्यक्त करणारे वृत्त ‘लोकमत’ ने १० जुलै रोजी दिले होते, ते खरे ठरले.
अर्थात, त्या वेळी काही पावत्या टॅली न झाल्यामुळे नेमकी किती रोकड गेली, हे कंपनी व्यवस्थापनाकडून कळू न शकल्यामुळे, नऊ कोटी १६ लाखांचा आकडा प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) दिला होता, असे पोलिसांनी सांगितले.
नाहीतर मी डोक्यात दगड घालेन
ज्या किरण साळुंखे याच्याकडे एक कोटी रुपये मिळाले, त्यानेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हरी वाघ आणि भास्कर शिंदे यांना लुटीचा बनाव रचण्यास सांगितले. त्या वेळी ‘माझ्या पायावर दगडाने मारहाण कर. अन्यथा, मी तुमच्या डोक्यात दगड घालीन,’ अशी धमकीही त्याने भास्करला दिली. त्याने सांगितल्याप्रमाणे भास्करने त्याच्या पायावर दगड घातले आणि तो पसार झाला. जखमी किरणच्या पायावरील उपचार झाल्यानंतर त्यालाही ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मोठी रक्कम मिळाली.
या दरोड्यातील अमोल कर्ले, आकाश चव्हाण, उमेश वाघ, दिनेश आव्हाड, मयूर कदम, हरिश्चंद्र मते, नवनाथ चव्हाण, पांडुरंग चव्हाण आणि योगेश चव्हाण या आरोपींना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्याकडून आणखी रोकड मिळण्याची शक्यता असून, आणखी एका फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. सर्वांच्या कोठडीत १३ जुलैपर्यंत वाढ करण्याची मागणी गुन्हे अन्वेषण विभागाने ठाणे न्यायालयाकडे केली.

Web Title: Checkmate Draft: One crore seized from Nashik; Increased custody till July 13