गर्भलिंगपरीक्षणासाठी जाच; गरोदर विवाहितेची दोन मुलींसह आत्महत्या
By Admin | Updated: July 21, 2016 20:11 IST2016-07-21T20:11:18+5:302016-07-21T20:11:18+5:30
दोन मुलीनंतर तिसऱ्यांदा गरोदर राहिलेल्या रेखा भागवत सानप (२५) या विवाहितेस गर्भलिंग परीक्षणासाठी सासरच्यांनी छळ केला.

गर्भलिंगपरीक्षणासाठी जाच; गरोदर विवाहितेची दोन मुलींसह आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २१ : दोन मुलीनंतर तिसऱ्यांदा गरोदर राहिलेल्या रेखा भागवत सानप (२५) या विवाहितेस गर्भलिंग परीक्षणासाठी सासरच्यांनी छळ केला. या छळाला कंटाळून तिने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना पाटोदा तालुक्यातील घुलेवाडी येथे गुरुवारी उघडकीस आली असून खळबळ उडाली आहे.
पिंकी भागवत घुले (४), राधिका भागवत घुले (२) अशी त्या दुर्दैवी मुलींची नावे आहेत. दोन दिवसांपासून ती मुलींसह बेपत्ता होती. शेतात जाते असे सांगून ती घराबाहेर पडली . मात्र, परतलीच नाही. त्यामुळे सासरचे तिचा शोध घेत होते. ती बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली नव्हती. माहेरच्यांना कळविले होते. गुरुवारी सकाळी स्वत:च्याच शेतातील विहिरीत तिघी मायलेकींचे मृतदेह तिचा पती भागवत याला आढळून आले. आष्टी तालुक्यातील मातावळी हे रेखाचे माहेर आहे. सहा वर्षांपूर्वी तिचा विवाह भागवत सानपसोबत झाला होता.
लग्नानंतर त्यांना पिंकी व राधिका या दोन मुली झाल्या. तिसऱ्यांदा रेखा गरोदर होती. तिला चार महिने झाले होते. अगोदरच्या दोन्ही मुलीच असल्याने गर्भिचकित्सा करण्यासाठी सासरच्या लोकांनी लकडा लावला होता . मात्र, रेखाचा निदान करण्यास विरोध होता. त्यामुळे तिचा जाच आणखीच वाढला होता. शिवाय ट्रक्टरचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ होत असल्याने ती वैतागली होती. यातून तिने टोकाचे पाऊल उचलले. उपअधीक्षक डॉ अभिजीत पाटील , निरीक्षक आदीनाथ रायकर , सहाय्यक निरीक्षक एस.एम. राठोड हे घटनास्थळी तळ ठोकून होते .
रावसाहेब लक्ष्मण बांगर यांच्या फिर्यादीवरुन पती भागवत सोमीनाथ घुले , सासरा सोमीनाथ मल्हारी घुले, सासू आशा सोमीनाथ घुले , नणंद निर्गुणा सोमीनाथ घुले यांच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पाटोदा ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यापैकी भागवत व सोमीनाथ या दोघांना अटक केली आहे. मयत रेखाविरुद्धही मुलीच्या खूनप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
सासरकडील मंडळीकडून तोडफोड
रेखाच्या माहेरच्या लोकांनी सासरच्यांना अटक करेपर्यंत मृतदेह विहिरीबाहेर काढण्यास विरोध केला. त्यामुळे तणावाचे वातवरण निर्माण झाले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर माहेरकडील मंडळींनी मृतदेह बाहेर काढण्यास तयार झाले. गावातील घरी सासरच्या मंडळींना तोडफोड केली.
एकाच चितेवर अंत्यसंस्कार
पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात तिन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर दुपारी चार वाजता मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. घुलेवाडी येथे सायंकाळी दोन मुलींसह रेखा यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी हुदंके व आक्रोशामुळे परिसर सून्न झाला होता. गावात रात्री उशिरापर्यंत एकही चूल पेटली नाही.