अमित शहांची डायरी तपासा, सापडेल सर्व गुन्ह्यांची जंत्री!
By Admin | Updated: September 7, 2014 03:10 IST2014-09-07T03:10:06+5:302014-09-07T03:10:06+5:30
आघाडी सरकारवर घोटाळ्यांचा बेलगाम आरोप करणा:या भाजपा अध्यक्ष अमित शहांची डायरी जरा तपासा. त्यांच्यावर किती अन् कुठे कुठे गुन्हे आहेत याची सगळी नोंद त्यात सापडेल,
अमित शहांची डायरी तपासा, सापडेल सर्व गुन्ह्यांची जंत्री!
शरद पवारांचा पलटवार : राष्ट्रवादीने फुंकला निवडणुकीचा बिगुल
मुंबई : आघाडी सरकारवर घोटाळ्यांचा बेलगाम आरोप करणा:या भाजपा अध्यक्ष अमित शहांची डायरी जरा तपासा. त्यांच्यावर किती अन् कुठे कुठे गुन्हे आहेत याची सगळी नोंद त्यात सापडेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर जोरदार पलटवार केला. भाजपा अध्यक्षांना कधीकाळी मदत केली म्हणून सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती सदाशिवम यांना केरळ राज्यपालपदाची बक्षिसी दिली काय, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ आज येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पवार यांच्या हस्ते उत्साही वातावरणात झाला, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री, नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकसभेचा निकाल विपरीत लागला असला तरी विधानसभेत वेगळा निकाल लागेल. राज्याची सूत्रे कोणाकडे द्यायची याचा लोक शहाणपणाने निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त करून पवार म्हणाले की, जागावाटपाबाबत प्रक्रिया सुरू असून लवकरच याबाबतचा निर्णय होईल. आम्हाला एकत्रितच काम करावे लागेल. कुणाला मंत्री, आमदार करण्याइतपत या निवडणुकीचा राष्ट्रवादीच्या दृष्टीने मर्यादित अर्थ नाही. महाराष्ट्रात केवळ 17 टक्के जमीन सिंचनाखाली आहे. शेतकरी जगाच्या स्पर्धेत उतरला पाहिजे. उद्योगात महाराष्ट्र नंबर एक असला तरी राज्याच्या सर्व भागात हा विकास पोहोचवावा लागेल. मुली, आदिवासी आणि मुस्लिमांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असून, त्यासाठी आम्हाला पुढची पाच वर्षे सत्ता हवी आहे, असे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या प्रगती अहवालाचे (रिपोर्ट कार्ड) प्रकाशनही करण्यात आले. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह काँग्रेस मंत्र्यांच्या विभागांनी घेतलेल्या निर्णयांचे श्रेयही त्यात घेण्यात आले. अजित पवार भाषणाला उभे राहिले तेव्हा ‘एकच वादा, अजित दादा’ असे नारे लागले. (विशेष प्रतिनिधी)
ती मंडळी खाकीत बघायची आहे !
ज्यांना पक्षाने आजवर खूप दिले, तीच मंडळी अधिक काही मिळविण्याच्या हेतूने अन्य पक्षांत गेली आहे. आजवर ज्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या नावाने भाषणो केली, ती मंडळी दस:याला खाकी हाफ चड्डीत (रा. स्व. संघाच्या) कशी दिसतील, हे मला बघायचे आहे. अशा संधिसाधूंची फार दखल घेण्याची गरज नाही, असे पवार यांनी सुनावले.
हायटेक राष्ट्रवादी : आजच्या प्रचाराच्या शुभारंभी प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची मरगळ राष्ट्रवादीने झटकली असल्याचे जाणवले. या वेळी दाखविण्यात आलेल्या प्रचारफिती, सोशल मीडियाचा केलेला वापर, तयार केलेली गीते बघता राष्ट्रवादी हायटेक प्रचार यंत्रणोसह सज्ज झाल्याचे जाणवले.
स्वतंत्र विदर्भ नको - पटेल
गोंदिया, भंडारासारख्या टोकावरील जिल्ह्यांत वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी नाही. त्यांना महाराष्ट्रातच राहायचे आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला हा अपप्रचार आहे, असे सांगत आघाडी होईल ही आमची अजूनही अपेक्षा आहे; पण राष्ट्रवादी लाचार असल्याचे कोणी समजू नये, असा इशारा प्रफुल्ल पटेल यांनी दिला.
बदनामीचे षड्यंत्र - तटकरे
आमच्या नेत्यांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले जात असून, आम्ही त्यांना चोख उत्तर देऊ. आमची काँग्रेससोबत जाण्याची वा स्वबळावर लढण्याची तयारी आहे. साहेब (पवार) देतील तो आदेश अंतिम असेल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.