सीएविरुद्धचा फसवणूक, बलात्काराचा खटला रद्द

By Admin | Updated: May 15, 2015 02:30 IST2015-05-15T02:30:41+5:302015-05-15T02:30:41+5:30

शादी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्न करण्याचे खोटे आश्वासन देत बलात्कार केल्याच्या

Cheating against CA, cancellation of rape case | सीएविरुद्धचा फसवणूक, बलात्काराचा खटला रद्द

सीएविरुद्धचा फसवणूक, बलात्काराचा खटला रद्द

मुंबई : शादी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्न करण्याचे खोटे आश्वासन देत बलात्कार केल्याच्या आरोपावरून पुण्यातील घटस्फोटित महिलेने एका चार्टर्ड अकाऊन्टंटवर गुदरलेला फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील हा चार्टर्ड अकाऊन्टंट दुबईत मोठ्या पगाराच्या नोकरीला आहे.
या उच्चशिक्षित महिलेने हडपसर पोलिसांत नोंदविलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ४२० व ३७६ अन्वये पुणे न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला होता. एखाद्या पुरुषाने लग्नाचे खोटे आश्वासन देत लैंगिक संबंध ठेवत महिलेची फसवणूक करणे आणि मनात लग्न करण्याची इच्छा असूनही त्या महिलेनेच नकार दिल्याने त्या आश्वासनाची पूर्तता न करता येणे यात फरक आहे. यापैकी दुसऱ्या प्रकारात त्या पुरुषाने लग्नाचे खोटे आश्वासन दिले असे म्हणता येत नाही व अशा परिस्थितीत झालेला लैंगिक संबंध बलात्कारही ठरत नाही, असे न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने नमूद केले.
या महिलेने नोंदविलेली फिर्याद आहे तशी वाचली तरी त्यातून आरोपीने लग्नाचा आधीचा प्रस्ताव कायमसाठी फेटाळला, असे कुठेही दिसत नाही. त्याने फक्त आधी ठरलेल्या तारखेला लग्न न करता ते आणखी विचार करण्यासाठी पुढे ढकलले होते. उलट फिर्यादी महिलेनेच अवास्तव अटी घालून लग्न करण्यास नकार दिल्याचे दिसते. अशा परिस्थितीत हा खटला पुढे सुरु ठेवणे म्हणजे न्यायप्रक्रियेचा तद्दन दुरुपयोग ठरेल, असेही न्यायालयाने म्हटले.
न्यायालयाने आरोपीचे शादी डॉट कॉमवरील लॉगइन रेकॉर्डही तपासले. त्यावरून आरोपीने एकीकीडे आपल्याशी लग्नाची बोलणी सुरु ठेवत दुसरीकडे इतर विवाहेच्छु महिलांशीही संपर्क सुरु ठेवला होता, या फिर्यादीच्या आरोपातही तथ्य नसल्याचे म्हटले. न्यायालयाने म्हटले की, फिर्यादीने लग्नास नकार दिल्यानंतरच आरोपीने त्या संकेतस्थळावरील इतर विवाहेच्छुंशी संपर्क केल्याचे दिसते.
हा चार्टर्ड अकाऊन्टन्ट ४७ वर्षांचा असून त्याच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट घेतला आहे. त्याला तिच्यापासून झालेला एक १३ वर्षांचा मुलगा असून तोही वडिलांसोबत दुबईमध्येच राहतो. फिर्यादीमधील कथनांचाच हवाला देत न्यायालय म्हणते की, आरोपीने शादी डॉट कॉमवर स्वत:चे प्रोफाईल टोपणनावाने टाकले होते. परंतु पहिल्या भेटीतच त्याने फिर्यादीला आपले खरे नाव, कौटुंबिक पार्श्वभूमी सांगून आधीच्या लग्नाविषयीही माहिती दिली होती. एवढेच नव्हे तर एका श्राद्धविधीच्या वेळी त्याने आपल्या सर्व नातेवाईकांशी तिची ओळखही करून दिली होती. फिर्यादीही काही दिवस दुबईला जाऊन आरोपी व त्याच्या मुलासोबत राहिली होती. यावरून मनात फसवणुकीचा हेतू ठेवूनच आरोपीने शादी डॉट कॉमवर नोंदणी केली होती,असे म्हणता येत नाही.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Cheating against CA, cancellation of rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.