स्वस्त घरकुलासाठी मालमत्ताकरही स्वस्त
By Admin | Updated: May 21, 2016 01:38 IST2016-05-21T01:38:55+5:302016-05-21T01:38:55+5:30
जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या स्वस्त घरकुल योजनेतील रहिवाशांना मालमत्ताकरात सवलत मिळणार आहे

स्वस्त घरकुलासाठी मालमत्ताकरही स्वस्त
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या स्वस्त घरकुल योजनेतील रहिवाशांना मालमत्ताकरात सवलत मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
स्वस्त घरकुल प्रकल्पातील रहिवाशांना महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागामार्फत या सदनिकाधारकांना मालमत्ताकराची बिले देण्यात आली आहेत.
मात्र, शहरातील विविध संघटनांनी या प्रकल्पातील मालमत्तांना कर आकारू नये अथवा सवलत द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार विशेष विकास प्रकल्पांच्या इमारतीच्या आणि जमिनींच्या बाबतीत राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे वेळोवेळी निश्चित केलेल्या किंवा कमी केलेल्या दराने मालमत्ताकर आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार स्थायी समिती सभा व महापालिका सभा यांनी ठराव करून त्यास शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार या प्रकल्पातील निवासी घरांना सवलतीच्या दरात मालमत्ताकर आकारणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार पहिल्या वर्षापासून दहाव्या वर्षापर्यंत वसूल करण्यात आलेल्या मालमत्ताकराच्या दराच्या २० टक्के सूट देण्यात येणार आहे. ११ वर्षांपासून १५व्या वर्षापर्यंत मालमत्ताकराच्या ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
>हा प्रस्ताव सादर करताना त्यामध्ये करसवलत मिळावी यासाठी मागणी केलेल्या विविध संघटनांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर आक्षेप घेत सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या की, प्रस्ताव तयार करताना कोणत्याही संघटनांचे नाव यायला नको, त्याचे भांडवल केले जाते. तसेच शासनाकडे केवळ प्रस्ताव पाठविले जातात. मात्र, त्यांचा पाठपुरावाही व्हायला हवा, असेही नगरसेवकांनी म्हणाले.