मिहानमधील उद्योगांना स्वस्त वीज
By Admin | Updated: November 23, 2014 00:40 IST2014-11-23T00:40:38+5:302014-11-23T00:40:38+5:30
मिहान-सेझमधील उद्योगांना शनिवार मध्यरात्रीपासून प्रति युनिट ४.३९ दराने वीज पुरवठा सुरू झाला. पण स्वस्त दरातील वीज केवळ तीन महिनेच अर्थात २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच मिळेल. वाचकांना हे माहीतच असेल की,

मिहानमधील उद्योगांना स्वस्त वीज
केवळ तीनच महिने फायदा : गुंतवणूकदार आकर्षित होणार
सोपान पांढरीपांडे -नागपूर
मिहान-सेझमधील उद्योगांना शनिवार मध्यरात्रीपासून प्रति युनिट ४.३९ दराने वीज पुरवठा सुरू झाला. पण स्वस्त दरातील वीज केवळ तीन महिनेच अर्थात २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच मिळेल. वाचकांना हे माहीतच असेल की, ३ नोव्हेंबरला नागपुरातील प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहान-सेझमधील उद्योगांना १५ दिवसाच्या आत स्वस्त दरात वीज मिळेल, अशी घोषणा केली होती. त्याचे कारण हे की, अभिजित समूहाने यावर्षीच्या मार्चमध्ये आपला औष्णिक ऊर्जा प्रकल्प बंद केल्यानंतर येथील उद्योगांना महावितरणकडून प्रति युनिट ७ ते ८ रुपये दराने वीज खरेदी करावी लागत होती.
स्वस्त वीज कशी मिळणार?
मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा उघड केले होते की, एमएडीसी ही मिहान-सेझची नोडल एजन्सी असून त्यांच्याकडे वीज वितरणाचा परवाना आहे. या परवान्याचा उपयोग ते खुल्या बाजारातून अर्थात एनर्जी एक्सचेंज आॅफ इंडियाकडून वीज खरेदीसाठी करतील आणि मिहान-सेझमधील उद्योगांना देतील. मुख्यमंत्री हे एमएडीसीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, हे उल्लेखनीय. यादरम्यान गेल्या आठवड्यात एमएडीसीने वीज पुरवठ्यासाठी परवानगी मिळावी, या आशयाचा अर्ज महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे केला होता. अंतिम टेरिफ निश्चित करून अर्ज आयोगाने निकाली काढताना उद्योगांना विजेचे वितरण करण्यासाठी १९ नोव्हेंबरला एमईआरसीने प्रति युनिट ४.३८६ रुपये अर्थात ४.३९ रुपये दर निश्चित केला. त्यानंतर एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी शनिवार मध्यरात्रीपासून स्वस्त दरातील वीजपुरवठा सुरू केला.
उपाय तात्पुरता
श्रीखंडे यांनी सांगितले की, आयोगाने मान्यता दिलेला प्रति युनिट ४.३० रुपये दर हा केवळ तीन महिन्यांसाठी अर्थात २८ फेब्रुवारीपर्यंतच राहील. त्यानंतर टेरिफवर पुनर्विचार होईल. हे जाणून घेणे गरजेचे आहे की, एनर्जी एक्स्चेंजचे कार्य मागणी आणि पुरवठ्यावर चालते. त्यामुळे विजेचे दर प्रत्येक तासाला बदलत असतात. अशा वातावरण वीज खरेदी अडचणीची ठरणार आहे. सध्या मिहान-सेझमध्ये केवळ १२ युनिट कार्यरत आहेत. दोन महिन्यांत टीसीएस आणि बोर्इंग एमआरओ हे दोन युनिट पुन्हा कार्यरत होतील. एमएडीसीचे मुख्य अभियंते एस.व्ही. चहांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोन महिन्यानंतर विजेची मागणी २ वरून ५ मेगावॅटवर जाईल. एनर्जी एक्स्चेंजकडून एवढी वीज खरेदी करणे सध्यस्थितीत शक्य आहे. पण जेव्हा मागणी ५० मेगावॅटवर जाईल तेव्हा खरी परीक्षा राहील. कारण एवढी वीज बाजारदराने विकत घ्यावी लागेल. स्वस्त दरात वीज उपलब्ध झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. हा दर गुंतवणूकदारांना आकर्षित करणार आहे.
अंतिम टेरिफ ५ रुपये
प्रति युनिट होणार!
एमएडीसीने प्रति युनिट ४.३९ रुपये वीज पुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली असली तरीही प्रत्यक्षात हा दर ५ रुपये प्रति युनिट असू शकतो. कारण एमएडीसी विजेच्या पुरवठ्यासाठी अभिजित समूहाच्या ट्रान्समिशन नेटवर्कचा उपयोग करीत आहे. या नेटवर्कचा किराया अभिजित समूहाला द्यावा लागेल. अभिजित समूहाचे अध्यक्ष सतीश श्रीखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आयोगाच्या निर्णयानंतर अभिजित समूहाने प्रति युनिट किरायाच्या घटकांची गोळाबेरीज केली असून लवकरच आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करणार आहे. त्यानंतर हा किराया एमएडीसी ग्राहकांकडून वसूल करेल. हा किराया प्रति युनिट ५० ते ७० पैसे असू शकते. त्यामुळे प्रति युनिट दर ५ रुपयांवर जाणार आहे.