‘शाहूं’चे चरित्र आता जर्मन भाषेत
By Admin | Updated: November 13, 2014 00:04 IST2014-11-12T23:26:04+5:302014-11-13T00:04:24+5:30
येत्या बुधवारी प्रकाशन : जयसिंगराव पवार यांच्या ग्रंथाचा सुधीर पेडणेकर यांच्याकडून अनुवाद

‘शाहूं’चे चरित्र आता जर्मन भाषेत
भरत बुटाले-कोल्हापूर --लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती यांच्या जीवनावरील ग्रंथ जर्मन भाषेत अनुवादित करण्यात आला असून, त्याचे येत्या बुधवारी (दि. १२) प्रकाशन होणार आहे. आतापर्यंत या ग्रंथाचा आठ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. इंग्रजीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहू महाराजांवरील अनुवादित होणारा हा पहिलाच ग्रंथ आहे, अशी माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंंगराव पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
स्वीत्झर्लंडमध्ये स्थायिक पण मूळचे भारतीय असलेले (हिरलगे,
ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) सुधीर पेडणेकर यांनी या चरित्रग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केलेला आहे. राजर्षी शाहूंचे जीवन व कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे, या दृष्टिकोनातून आमच्यात झालेल्या चर्चेनंतर हा ग्रंथ तयार करण्याचे ठरविले. ‘राजर्षी शाहू छत्रपती’ या मथळ्याखाली या ग्रंथाच्या अनुवादापासून ते तयार करण्यापर्यंतची सर्व जबाबदारी पेडणेकर यांनी उचलली. जर्मन भाषेत ग्रंथ तयार करून ती पूर्णही केली. शिवाजी विद्यापीठातर्फे होणाऱ्या सोहळ्यात फेडरल रिपब्लिक आॅफ जर्मनचे कौन्सुल जनरल सिबर्ट यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वडील काशीनाथ पेडणेकर यांची शैक्षणिक जडणघडण शाहू महाराजांमुळेच झाली. ते शिकले म्हणून आम्ही शिकलो आणि आमची इथंपर्यंत वाटचाल झाली. आमच्याबरोबरच असंख्य लोकांना प्रेरणा व दिशाही मिळाली. ब्रिटिशांच्या सार्वभौमत्वाखाली असतानाही त्यांनी केलेले समाजसुधारणेचे महान कार्य ग्रंथरूपात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे म्हणून हा ग्रंथ अनुवादित केल्याचे सांगून पेडणेकर म्हणाले की, माझे महाविद्यालयीन शिक्षण जर्मन भाषेत झाले असून, तेथे नोकरी आणि व्यवसायामुळे ती माझी मातृभाषाच झाली आहे. त्यामुळेच हा ग्रंथ जर्मन भाषेत अनुवादित करण्याचे पक्के केले. हा ग्रंथ अनुवाद करण्यासाठी हाती घेण्यापूर्वी याच्या मराठी व इंग्रजीतील ग्रंथांचा अभ्यास केला. कमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थ लागावा, अशा पद्धतीने अनुवाद केला. १६९ पानांच्या या ग्रंथाच्या अनुवादाचे काम सहा महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर मुद्रितशोधन, संपादन आणि छपाईसाठी सहा महिने लागले. मुद्रितशोधन व संपादन हायडल बर्ग युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर मुल्लर
यांनी केले. मुखपृष्ठ मुंबईतील आर्टिस्टकडून तयार करून घेतले आणि लंडनमध्ये या ग्रंथाची छपाई केल्याचे त्यांनी सांगितले.
हा ग्रंथ तयार केल्यानंतर आपल्या हातून चांगले काहीतरी घडल्याचे समाधान वाटते. शिवाय या लोकराजाने केलेले सर्वांत महत्त्वाचे समाजसुधारणेचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे व प्रबोधन व्हावे, इतकीच अपेक्षा आहे. म्हणूनच या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर
‘द लाईफ आॅफ व्हिजनरी आॅफ सोशल रिफॉर्मर’ असे उपशीर्षक दिले आहे. इतकेच नव्हे तर सुमारे १०० विद्यापीठ व संस्थाना हा ग्रंथ मोफत वितरित करण्यात येणार आहे.
- सुधीर पेडणेकर
लोकराजा शाहू महाराजांनी केलेले समाजसुधारणेचे अतुलनीय कार्य हे ग्रंथरूपात देशातील शिवाय जगातील प्रमुख भाषिकांपर्यंत पोहोचावे, हीच माझी आंतरिक तळमळ आणि आयुष्याचे मिशन आहे.
- प्रा. डॉ. जयसिंगराव पवार
मूळ चरित्रग्रंथ
कोल्हापुरातील महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने राजर्षी शाहू महाराजांचे जीवन व कार्य ग्रंथरूपाने लोकांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविले. त्यानुसार प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी १२०० पानांचा ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ संपादित केला. तीन खंडात असलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन २००१ मध्ये झाले होते. या ग्रंथात राजर्षी शाहूंचे विश्लेषणात्मक चरित्र, दुसऱ्या खंडात नामवंत अशा विचारवंत, इतिहासकारांचे संशोधनात्मक लेख आणि तिसऱ्या खंडामध्ये महाराजांची भाषणे तसेच त्यांचा पत्रव्यवहार, आदेश, कायदे आणि २५० च्या वर छायाचित्रे व पेंटिंगचा समावेश आहे.
आठ भाषांमध्ये अनुवाद
२०१० मध्ये या ग्रंथाचा कानडी भाषेत, तर त्यानंतर हिंदी, तेलुगू, सिंधी, गुजराती, ऊर्दू, कोकणी आणि इंग्रजीत अनुवाद करण्यात आला असून, अलीकडेच मेघा पानसरे व त्यांच्या रशियन सहकारी तानिया यांनी या ग्रंथाचा रशियन भाषेत अनुवाद केला आहे. या ग्रंथाचा फ्रेंच आणि जपानी भाषेतील अनुवाद सध्या सुरू आहे.