दुय्यम निबंधक कार्यालयाला ‘धडा’
By Admin | Updated: November 10, 2014 04:12 IST2014-11-10T04:12:18+5:302014-11-10T04:12:18+5:30
जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील गैरप्रकार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार

दुय्यम निबंधक कार्यालयाला ‘धडा’
पारनेर (जि. अहमदनगर) : जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील गैरप्रकार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील बैठकीत सांगितले़
राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी यांनी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात सुरू केलेली नागरिकांची सनद घराघरांत पोहोचविणार असल्याचे हजारे म्हणाले़ अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीच्या राज्यातील कार्यकर्त्यांचे तीन दिवसीय अभ्यास मार्गदर्शन शिबिर राळेगणसिद्धीत सुरू आहे़
रविवारी शिबिरात मार्गदर्शन करताना हजारे म्हणाले की, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी यांनी नागरिकांची सनद तयार करून राज्यात एका नव्या आदर्श कारभाराचे उदाहरण ठेवले आहे. राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन-खरेदी विक्रीचे व्यवहार होताना होणाऱ्या गैरप्रकारांना या सनदेमुळे आळा बसणार आहे. अर्थात यासाठी आता भष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांची सनद घराघरांत पोहोचवावी लागणार आहे. याची व्यवस्थित अंमलबजवणी होण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. सर्व जण कार्यकर्ते म्हणूनच कार्यरत राहतील. आम्हीसुद्धा कधीही पदासाठी काम केले नाही़ आपण जनतेची सेवा करण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)