मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभार, फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती
By Admin | Updated: July 10, 2017 12:37 IST2017-07-10T12:22:55+5:302017-07-10T12:37:07+5:30
निकाल वेळेवर मिळत नसल्याने फार्मसीच्या जवळपास 40 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे

मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभार, फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - मुंबई विद्यापीठाचे निकाल उशीरा लागत असल्याचा फटका फार्मसीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. निकाल वेळेवर मिळत नसल्याने फार्मसीच्या जवळपास 40 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हे सर्व विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या बाहेर जमा झाले असून आपला निकाल लवकराच लवकर हाती देण्याची मागणी करत आहेत. अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांसमोर आपलं एक महत्वाचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची, सोबतच ‘नायपर’सारख्या प्रतिष्ठीत संस्थेत एमफार्म अभ्यासक्रमाचा प्रवेश हुकण्याची भीती निर्माण झाली आहे.
आणखी वाचा
मुंबई विद्यापीठातील बी. फार्मच्या 2017 बॅचमधील विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांसहित सर्वात कठीण मानली जाणारी ‘नायपर’ (राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संचालनालय) या संस्थेची प्रवेश परिक्षा उत्तीर्ण केली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार 17 जुलै रोजी चंदिगड येथे विद्यार्थ्यांचं समुपदेशन होणार आहे. मात्र ‘नायपर’ने समुपदेशनादरम्यान आठव्या सेमिस्टरचा निकाल दाखल करणं बंधनकारक केलं आहे. दुसरीकडे मुंबई विद्यापीठाचे निकाल उशीरा लागत असून समुदेशनाच्या आधी तो हाती येण्याची शक्यता फार कमी आहे.
निकालाची मागणी करण्यासाठी कलिनाबाहेर जमलेले विद्यार्थी
विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठासमोर आपली समस्या मांडली असता निकाल उशीरा लागत असल्याचं एक पत्र त्यांनी दिलं. यानंतर विद्यार्थ्यीनी ‘नायपर’मधील संबंधित अधिका-यांशी संवाद साधला असता त्यांनी पत्र ग्राह्य धरण्यास नकार देत, निकालाची प्रत देणं बंधनकारक असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्याआधी तरी निकाल मिळावा यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी यासंबंधी शैक्षणिक मंत्री विनोद तावडे यांनाही पत्र लिहिलं आहे.