‘रोटी बँक’च्या वेळेत बदल
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30
डबेवाल्यांनी सुरू केलेल्या ‘रोटी बँक’च्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी या सुविधेची वेळ बदलण्यात आल्याची माहिती ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळा’ने दिली.

‘रोटी बँक’च्या वेळेत बदल
मुंबई : डबेवाल्यांनी सुरू केलेल्या ‘रोटी बँक’च्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी या सुविधेची वेळ बदलण्यात आल्याची माहिती ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळा’ने दिली. ‘रोटी बँक’ सुरू झाल्यापासून हेल्पलाइनवरील वाढता प्रतिसाद पाहता, आता या कॉलची सायंकाळी ६ ते ७ या वेळेत नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ ते ८ या वेळेत त्या-त्या विभागात जाऊन भुकेलेल्यांना ते अन्न देण्यात येईल.
रोटी बँकच्या सुविधेसाठी डबेवाले सायकलचा वापर करतात, पण काही वेळा अन्न जास्त असल्यास सायकलवरून नेता येत नाही, याची जाणीव होऊन डॉ. पवन अग्रवाल यांनी डबेवाल्यांना सायन ते मुलुंड, वांद्रे ते दहिसर या विभागाकरिता दोन चारचाकी वाहने दिली आहेत. लवकरच या वाहनांद्वारे सेवा सुरू करण्यात येईल, शिवाय रोटी बँकच्या कामाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या वेळेत या वाहनांद्वारे विक्रोळी येथील गरीब विद्यार्थ्यांना शाळेत नेले आणि शाळेतून आणले जाईल, अशी माहिती मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली. रोटी बँकला मिळणारा प्रतिसाद आणि तिचा विस्तार पाहता, मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी अधिक वाहनांची आवश्यकता असून, इच्छुकांनी पुढाकार घेऊन मदत करावी, असे आवाहन तळेकर यांनी केले आहे. ‘रोटी बँक’च्या संकेतस्थळाचेही लवकरच अनावरण करण्यात येणार आहे, त्यामुळे या सेवेचा लाभ घेता येणार आहे.(प्रतिनिधी)