कोरडवाहू शेती वाचविण्यासाठी परिवर्तन मोहीम राबवा
By Admin | Updated: January 20, 2015 02:00 IST2015-01-20T02:00:42+5:302015-01-20T02:00:42+5:30
पावसाने ओढ दिल्यास कोरडवाहू शेतीतील पिके वाचविण्यासाठी संरक्षित सिंचन (प्रोटेक्टिव्ह इरिगेशन) हाच चांगला पर्याय आहे.

कोरडवाहू शेती वाचविण्यासाठी परिवर्तन मोहीम राबवा
प्रतिभाताई पाटील : ‘लोकमत’च्या ‘आयकॉन्स आॅफ खान्देश’ कॉफीटेबल बुकचे थाटात प्रकाशन
जळगाव : पावसाने ओढ दिल्यास कोरडवाहू शेतीतील पिके वाचविण्यासाठी संरक्षित सिंचन (प्रोटेक्टिव्ह इरिगेशन) हाच चांगला पर्याय आहे. त्यासाठी उत्तरेतील नद्यांमधील वाया जाणारे पाणीदेखील वाहून आणण्याची
गरज आहे. कोरडवाहू शेतकऱ्याला वाचविण्यासाठी परिवर्तनाची
मोहीम हाती घ्यावी, असे
आवाहन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.
‘लोकमत’ निर्मित ‘आयकॉन्स आॅफ खान्देश’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी खान्देशातील ३७ आयकॉन्सचा सत्कार केला.
प्रतिभाताई म्हणाल्या, की कोरडवाहू शेतकरीच प्रामुख्याने आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची
गरज आहे. राष्ट्रपतीपदी असताना
मी त्यासाठी राज्यपालांची
समिती नेमली होती. शिवराज
पाटील समितीचे अध्यक्ष होते. समितीने कोरडवाहू शेतीच्या
समस्या व शेतकरी आत्महत्यांचे
प्रमाण कमी होण्यासाठी
शिफारशी मागविल्या. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी समितीचा अहवाल अंमलबजावणीसाठी नियोजन आयोगाकडे पाठविला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन
यांनी अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत पाठपुरावा करावा, असेही त्यांनी
सुचविले. (प्रतिनिधी)
सिंचनाचा अनुशेष भरावा -खा. दर्डा
विदर्भ व खान्देशचा सिंचनाचा अनुशेष जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे भरून काढतील. महाजन यांचे सर्वच पक्षांत मित्र आहेत. त्यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी इतर पक्षांतील त्यांचे मित्र प्रार्थना करीत होते, असे लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा खासदार विजय दर्डा यांनी सांगताच सभागृहात खसखस पिकली. ‘आयकॉन्स’च्या माध्यमातून प्रेरणादायी काम करणाऱ्या मंडळींचे कार्य जगासमोर येत आहे. ‘आयकॉन्स’ची सुरुवात मुंबईपासून झाली. औरंगाबाद, पुणे, नागपुरात कार्यक्रम झाले आहेत. देशभरातील उद्योजक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींची उपस्थिती त्यासाठी लाभली, असेही ते म्हणाले.
‘लोकमत’चे कौतुक
‘लोकमत’च्या उपक्रमाचे प्रतिभातार्इंनी कौतुक केले. त्या म्हणाल्या, की ‘लोकमत’च्या प्रगतीचा आलेख सातत्याने चढता आहे. टीव्ही, मनोरंजन क्षेत्रातील या समूहाचे पाऊलही यशस्वी झाले आहे.