भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर
By Admin | Updated: October 23, 2014 03:29 IST2014-10-23T03:29:59+5:302014-10-23T03:29:59+5:30
भारतीय जनता पार्टीचे विद्यमान प्रदेशाध्यक्षपद देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या जागी विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे विद्यमान प्रदेशाध्यक्षपद देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या जागी विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
नवीन प्रदेशाध्यक्ष देताना सरकार आणि पक्ष यांच्यात समन्वयाची योग्य भूमिका वठवू शकणारी व्यक्ती निवडली जाईल, असे मानले जाते.
विदर्भाचा मुख्यमंत्री आणि पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष असा समन्वय पाटील यांच्या निमित्ताने साधला जाऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाने दमदार वाटचाल सुरू केली असल्यामुळे प्रदेशाध्यक्षपद या विभागाला दिले जाण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार किंवा पंकजा मुंडे हे प्रदेशाध्यक्ष होण्याची क्षमता असलेले नेते मंत्रिमंडळात असणार आहेत. त्यामुळे रा.स्व. संघाचे कट्टर कार्यकर्ते राहिलेले पाटील यांचा विचार प्रदेशाध्यक्षपदासाठी केला जाऊ शकतो. ते अभाविपचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ते निकटवर्ती आहेत.