नाशिक येथे शिवेसना ठाकरे गटाचे निर्धार शिबीर सुरू आहे. यावेळी आयोजित एका चर्चासत्रादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे तोंडभरून कौतुक केल्याचे दिसून आले. 'खैरे हे शिवसेनेचे शंकराचार्य आहेत,' अशा शब्दात राऊतांनी खैरेंचे कौतुक केले. याच वेळी, त्यांनी 'आपण कडवट शिवसैनिक कसे झालात?' असा प्रश्नही खैरेंना विचारला. यावर खैरे यांनीही बऱ्याच आठवणींना उजाळा दिला.राऊतांकडून खैरेंचा शंकराचार्य असा उल्लेख -चंद्रकांत खैरे यांचा शंकराचार्य असा उल्लेख करताना संजय राऊत म्हणाले, "चंद्रकांत खैरे आले आहेत. हिंदुत्वाचा मूर्तिमंत चेहरा आहेत शिवसेनेचा. बघा त्यांच्याकडे. त्यांना बघितले की मला शंकराचार्यांची आठवण येते. ते शिवसेनेचे शंकराचार्य आहेत. आपण निजामाची राजवट बघितली आहे. आपल्या आधीच्या पीढीने निजामासोबत संघर्ष केलेला आहे. आपण कडवट शिवसैनिक कसे झालात? म्हणजे आपल्यासारखा कडवट शिवसैनिक हा सर्वांचा आदर्श आहे. आपण सत्ता बघितली, सत्ता पचवली, पराभव पचवले. पण आजूनही हे भगवे उपरणे घेऊन आपण ठामपणे उभे आहात, हा कडवटपणा आपल्यात आला कुठून? असा प्रश्न विचारला असता खैरे म्हणाले, "मी 'मार्मिक'मुळे शिवसैनिक झालो."
मार्मिकमुळे शिवसैनिक झालो -आपण डवट शिवसैनिक कसे झालात? राऊतांच्या या प्रश्नाला उत्तर देताना खैरे म्हणाले, "मी मार्मिकमुळे शिवसैनिक झालो. आमचे वडील मार्मिक घेऊन येत असत. तेव्हा मी सातवी-आठवीला होतो. नंतर शिवसेना स्थापनही झाली. तेव्हा मार्मिकला यायचं आंधळं दळतं कुत्र पीठ खातं. मराठी माणसाला काही किंमतच नव्हती मुंबई आणि महाराष्ट्रात. साहेबांनी तेथून सुरूवात केली आणि १९६६ ला शिवसेना स्थापन झाली. नंतर १९६७ ला ठाणे जिंकले, १९६८ ला मुंबई महानगरपालिका जिंकली. त्यानंतर मी शिवसेनेकडे आकर्षिलो गेलो. आमच्या घरासमोर कामगार केंद्र होतं तेथे मुंबईचे पेपर येत होते, मुंबईचे पाचही पेपर मी वाचत होतो. त्यावून समजायचे कुठे शिवसेनेची शाखा स्थापन झाली. त्यासंदर्भात वाचायचो. तेथून मी शिवसैनिक झालो."
आधी तुम्ही शिवसेना मोठी करा -खैरे पुढे म्हणाले, "मला शिवसेना प्रमुखांचा आशिर्वाद १९७८ ला मिळाला. मी गिरगावमध्ये एका मित्राच्या घरी थांबलो होतो. तिकडे प्रचारासाठी गेलो होतो. तेव्हा मला समजले बाळासाहेबांची सभा सुरू आहे. मी धावत गोलो. साहेबांची सभा संपली. राष्ट्रगित झालं, तेवढ्यात मी वर घुसखोरी केली. मला शिवसैनिकांनी आडवलं. मी म्हणालो मला साहेबांचे दर्शन घ्यायचे आहे. यानंतर, मी अगदी लोटांगण घालून साहेबांचे दर्शन घेतले. ते म्हणाले, काय रे काय? मी म्हणालो, मी औरंगाबादचा शिवसैनिक. आपण या ना कधी. ते म्हणाले, आधी तुम्ही शिवसेना मोठी करा. मग मी येतो, अशी आठवणीह यावेळी चंद्रकांत खैरे यांनी सांगितली. चंद्रकांत खैरे हे धार्मिक वृत्तीचे, पक्षाशी एकनिष्ठ आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात."