ईस्थर अनुह्या हत्याप्रकरणी चंद्रभान सानपला फाशी

By Admin | Updated: October 31, 2015 02:36 IST2015-10-31T02:36:35+5:302015-10-31T02:36:35+5:30

आंध्र प्रदेशमधील २३वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या हिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या ३९वर्षीय चंद्रभान सानपला शुक्रवारी

Chandrabhan Sanapala hanged in Esther murder case | ईस्थर अनुह्या हत्याप्रकरणी चंद्रभान सानपला फाशी

ईस्थर अनुह्या हत्याप्रकरणी चंद्रभान सानपला फाशी

मुंबई : आंध्र प्रदेशमधील २३वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या हिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या ३९वर्षीय चंद्रभान सानपला शुक्रवारी विशेष महिला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली.
‘ही केस दुर्मीळ प्रकारात मोडत असल्याने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात येत आहे,’ असे विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी म्हटले.
सरकारी वकिलांनी सानपला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. सानपला सहानुभूती दाखवली तर समाजात चुकीचा संदेश जाईल; तसेच समाजाला आणि तिच्या पालकांना न्याय मिळाल्यासारखे वाटणार नाही. आरोपीने एका असहाय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. त्या मुलीने आरोपीवर विश्वास ठेवला आणि त्याने त्याचा फायदा घेतला, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी केला होता. तर बचावपक्षाच्या वकिलांनी त्याचे वय लक्षात घेता न्यायालयाने त्याला सहानुभूती दाखवावी, अशी विनंती न्या. जोशी यांना केली. २७ आॅक्टोबर रोजी न्यायालयाने सानप याला भारतीय दंडसंहिता कलम ३०२ (हत्या), ३७६ (बलात्कार) आणि कलम २०१ (पुरावे नष्ट करणे)यांद्वारे दोषी ठरवले.
ईस्थर हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी आंध्र प्रदेशमधील विजयवाडा पोलीस स्टेशनमध्ये केली. मात्र त्यांनी हे प्रकरण आपल्या अखत्यारीत येत नाही, असे म्हणत मुंबईमध्ये तक्रार करण्यास सांगितले. अखेरीस ईस्थरच्या काकांनी आणि वडिलांनी कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.
(प्रतिनिधी)

टीसीएसमध्ये असिस्टंट सिस्टीम इंजिनीअर असलेली ईस्थर अनुह्या आंध्र प्रदेशमध्ये तिच्या पालकांकडे गेली होती. ५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे ईस्थर लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरली. मात्र गोरेगावला जाण्यासाठी काहीच सोय नसल्याने ती तेथे बराच काळ थांबली. याचा फायदा घेऊन सानपने तिला आपल्या बाइकवर बसण्यास सांगितले. त्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली.
फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सानपला कोर्टरूमच्या बाहेर आणल्यावर त्याला अश्रू आवरता आले नाहीत. सानप ढसाढसा रडला. आपल्याला या केसमध्ये नाहक गोवण्यात आले आहे. खोटे आरोप लावण्यात आले आहेत, असे सानपने कोर्टाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना म्हटले.
कोणताही गुन्हा न करता मला फाशीची शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा मला नव्हती. मी माझ्या मुलीला दोन वर्षे पाहिलेले नाही, असेही सानपने म्हटले.

Web Title: Chandrabhan Sanapala hanged in Esther murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.