"त्या" वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटलांनी केली दानवेंची पाठराखण
By Admin | Updated: May 14, 2017 15:26 IST2017-05-14T15:19:22+5:302017-05-14T15:26:01+5:30
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य काढल्याप्रकरणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली आहे.

"त्या" वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटलांनी केली दानवेंची पाठराखण
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 14 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य काढल्याप्रकरणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली आहे. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं ते म्हणाले.
दानवे स्वतः शेतकरी असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते सातत्यानं भांडतात. ते कधी शेतकरीविरोधी बोलू शकत नाहीत. राजीनामा मागणं हे विरोधकांचं कामच आहे असं पाटील म्हणाले. एका कार्यक्रमासाठी आज पाटील पिंपरीत आले होते.
तसेच, दानवेंच्या वक्तव्याने शेतकरी नाराज नसून लवकरच सुरू होणा-या भाजपच्या संवादयात्रेचं नेतृत्वही दानवे करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“इतकी तूर खरेदी करूनही शेतकऱ्यांचे रडगाणे सुरुच आहे. एक लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली तरी रडतात साले.” असं वक्तव्य दानवेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं.अडचणी वाढत असल्याचं पाहून दानवेंनी नंतर जर मनं दुखावली असतील तर दिलगीरी व्यक्त करतो अशा शब्दांत माफी मागितली होती. सर्वच स्थरांतून दानवेंवर टीका व्हायला सुरूवात झाली.
दानवेंच्या डोक्यात सत्तेची नशा-
दानवेंच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याने ते शेतकऱ्यांबाबत असंसदीय शब्द वापरून अशी बेताल वक्तव्ये करत आहेत. राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची सत्तेची नशा उतरवल्याशिवाय राहणार नाहीत.” अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
जीभ झडायला पाहिजे-
“शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या दानवेंची जीभ झडायला पाहिजे. शेतकऱ्यांबद्दल द्वेषच यातून दिसून येतो. फक्त दानवे नव्हे, संपूर्ण सरकारमध्ये शेतकऱ्यांबद्दल असाच द्वेष आहे. यांना शेतकरी समूहच नष्ट करायचा आहे. शेतकऱ्यांबद्दल असे गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांची मस्ती शेतकरी जिरवल्याशिवाय राहणार नाहीत.”, असा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दानवेंवर केला.