अध्यक्षपदाची जुन्नरची संधी हुकणार!

By Admin | Updated: March 6, 2017 01:21 IST2017-03-06T01:21:25+5:302017-03-06T01:21:25+5:30

राज्यात परिवर्तनाची लाट असताना पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले

Chance of the President will be missed! | अध्यक्षपदाची जुन्नरची संधी हुकणार!

अध्यक्षपदाची जुन्नरची संधी हुकणार!


पुणे : राज्यात परिवर्तनाची लाट असताना पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले असून, जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीला सुरुवात झाली आहे. रविवारी राष्ट्रवादीच्या गटनेते पदाची निवड झाली असून, एका मताने निवडून आलेले जुन्नरचे शरद लेंडे यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाने जुन्नरला हुलकावणी दिल्याची चर्चा सुरू
झाली आहे.
पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद
अध्यक्ष बंगल्यावर झालेल्या बैैठकीत ही निवड करण्यात आली. या वेळी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांच्यासह विद्यमान सभापती व तसेच निवडून आलेले सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आगामी अडीच वर्षांसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. आरक्षणात ७५ जागांपैैकी १९ जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यातील ७ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. यात जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव डिंगोरे या गटात अंकुश आमले, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर-सणसवाडी या गटात कुसुम मांढरे, खेड तालुक्यातील रेटवडी पिंपळगावतर्फे खेड या गटात निर्मला, हवेली तालुक्यातील उरुळीकांचन-सोरतापवाडी या गटात कीर्ती कांचन, मांजरी बु.-शेवाळवाडी गटात दिलीप घुले, बारामती तालुक्यातील वडगाव नि.- मोरगाव गटात विश्वास
देवकाते आणि इंदापूर तालुक्यातील भिगवण- शेटफळगढे गटात हनुमंत बंडगर यांचा समावेश आहे.
अध्यक्षपदाची संधी ही बारामती किंवा जुन्नर तालुक्याला मिळू शकते ही चर्चा निवडणुकीनंतर सुरू आहे. बारामती तालुक्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा निवडून आणल्याने ते त्यांचा दावा दाखवत आहेत. तर धनगरकार्ड या वर्षी अध्यक्षपदासाठी वापरले जाईल, अशी दुसरी चर्चा सुरू आहे. यात बारामतीत विश्वास देवकाते तर जुन्नरमधून पांडुरंग पवार ही दोन नावे समोर येत होती. देवकाते व पवार हे दोघेही धनगर समाजाचे आहेत. आता जुन्नर तालुक्याला गटनेतेपद दिल्याने पवार यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अध्यक्षपद हे बारामतीला मिळणार, पण देवकाते की दुसरे कोण हे सांगता येणार नाही, असेही काही पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
>राणीला राणीच राहू द्या!
गटनेतापदी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अनुभवी सदस्याचा गटनेतेपदासाठी विचार व्हावा, अशी सूचना पुढे आली. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीच इच्छुक असलेल्या विश्वास देवकाते व दौैंडच्या राणी शेळके यांचे गटनेतेपदासाठी नाव रणजित शिवतारे व वीरधवल जगदाळे यांनी सुचविले. मात्र, अजित पवार यांनी पदाधिकारी पदावर दावा असणाऱ्यांची या पदासाठी नावे नको. राणीला राणीच राहू द्या! असेही ते म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
>उपाध्यक्षपद हवे!
दौंड तालुक्यातून पारगाव केडगाव गटातून दुसऱ्यांदा राणी शेळके या निवडून आल्या आहेत. त्यांनी उपाध्यक्ष पदावर आपला दावा केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना त्या भेटणार असून पक्षाकडेही लेखी मागणी करणार आहेत.
एक मताची बक्षिसी
जिल्हा परिषदेच्या आळे-पिंपळवंडी गटामधे शरद लेंडे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे मंगेश काकडे यांच्यावर अवघ्या एक मताने विजय मिळविला. त्यांना राष्ट्रवादीने आपले गटनेते हे पद बहाल केले आहे.

Web Title: Chance of the President will be missed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.