हिंदूंचे सण-उत्सव होणारच, उद्धव ठाकरेंचे न्यायालयाला आव्हान
By Admin | Updated: August 20, 2016 08:30 IST2016-08-20T08:30:13+5:302016-08-20T08:30:13+5:30
हिंदूंचे सण-उत्सव रोखण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल व शिवसेना त्या असंतोषाचे नेतृत्व करेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादयकीच्या माध्यमातून दिला आहे

हिंदूंचे सण-उत्सव होणारच, उद्धव ठाकरेंचे न्यायालयाला आव्हान
>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आदी सर्व आमच्या श्रद्धेचे विषय आहेत. तेव्हा ‘राज्यकारभार’ करणार्या न्यायालयांनी निदान याबाबतीत तरी लक्ष्मणरेषा ओलांडू नये. लोकांनी त्यांचे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून दिले आहे. त्यांना काम करू द्या. भलेबुरे कळण्याइतपत डोके सरकारच्या मानेवर आहे. हे डोके उडवून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केलाच तर राष्ट्रीय व्यवस्थेचे सर्व थर कोसळतील. हिंदूंचे सण-उत्सव होणारच. ते रोखण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल व शिवसेना त्या असंतोषाचे नेतृत्व करेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादयकीच्या माध्यमातून दिला आहे.
दहीहंडीसह इतर सर्वच सण आणि उत्सवांच्या निमित्ताने न्यायालये जे ‘फतवे’ काढत आहेत त्यामुळे जनतेत संताप आहे. एक प्रकारची अस्वस्थता आहे व या असंतोषाचा स्फोट होऊन ‘न्यायालयास डोके आहे काय?’ असा सवाल विचारीत संतप्त जनता रस्त्यावर उतरू शकते, ही चिथावणी वगैरे न समजता लोकांच्या मनातील खदखद समजून सावध व्हावे, असा विनम्र इशारा देण्याचा प्रपंच आम्ही करीत आहोत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
न्यायालयाने नुकताच एक फतवा जारी करून दहीहंडीच्या उत्सवावर निराशेचे विरजण टाकले आहे. उत्साह आणि शौर्याच्या इच्छेवर जोरजबरदस्ती करून हा ‘जर्म’ चिरडण्याचा प्रकार राष्ट्रहिताला मारक आहे. दहीहंडीची लांबीरुंदी मोजून थर लावावे म्हणजे चार थरांवर दहीहंडी लावता कामा नये. बालगोविंदांना ‘मटकी’ फोडायला चढवू नये, अशी एक नियमावली न्यायालयाने जारी केली. सुरक्षेच्या कारणास्तव आमच्या न्यायालयाने ही काळजी घेतली आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातील गोविंदा पथकांवर निराशेची गुळणी घेऊन हात चोळत बसण्याची वेळ आली असा टोला उद्धव ठाकरेंनी मारला आहे.
मुंबईतील दहीहंडी पथकांची कीर्ती जगभरात आहे. दहीहंडीचे हे ‘थर’ किंवा मनोरे बघण्यासाठी जगातून पर्यटक येतात. ही सर्व दहीहंडी पथके प्रशिक्षित असतात व ते वर्षभर ‘मनोरे’ रचण्याची तयारी करीत असतात. बालगोविंदांचा विषय बाजूला ठेवला तर ‘टीका’ करावी असे तेथे काहीच नसते. सर्व गोविंदा पथकांची आपली स्वत:ची सुरक्षा व आरोग्यविषयक यंत्रणा जागेवर तत्पर असतेच. पुन्हा सरकार, पोलीस, मुंबई पालिका, राजकीय कार्यकर्ते आपापल्या परीने या गोविंदा पथकांना मदत करीत असतात. इतके होऊन अपघात होतात, दुखापती होतात. काही गोविंदा प्राणास मुकतात. हे दुर्दैवच म्हणावे लागेल; पण हे दुर्दैवाचे फेरे सर्वच ठिकाणी आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी न्यायालयांचे ‘फतवे’ चालतातच असं नसल्याचं असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
शेतकरी आत्महत्या करीत आहेत. चोर्या व खुनांचे प्रकार थांबत नाहीत. महिलांवरील बलात्कार व अत्याचार सुन्न करीत आहेत. राज्यव्यवस्था व कायदे-कानून जागेवर असताना हे सर्व घडत आहेच ना? इमारती कोसळत आहेत. पूल पडत आहेत. भ्रष्टाचार व अतिरेक्यांची खुनी होळी सुरूच आहे. जन्मठेप व फाशीसारख्या शिक्षा असूनही निर्घृण गुन्हे होण्याचे थांबत नाही व टेबलावर ‘ऑर्डर ऑर्डर’ असे आपटून हातोडे झिजले तरी गुन्हेगारांचे आक्रमण थांबत नाही. प्रत्यक्ष न्यायालयात उंबरठे झिजवून तरी खरा न्याय मिळतोय का असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
सण-उत्सवांवर असे फतव्यांचे बडगे पडणार असतील तर या देशातील उत्साह व शौर्याची तिरडी निघाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला इतर धर्मात फार लुडबूड करायची नाही. आपल्या न्यायालयांचीही ती हिंमत नाही; पण गणेशोत्सवात श्रीगणेशाच्या मंगलमूर्तीस फुटपट्टी लावण्यापासून सार्वजनिक उत्सवांच्या मंडपाचा आकार ठरविण्यापर्यंत फतवे निघत आहेत. नवरात्रीचे उत्सवही त्याच न्यायालयीन फतव्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. हिंदूंचे जिणे रोज कठीण करून नि:पक्षपाताचे व निधर्मीपणाचे पोकळ हातोडे मारणे हे राष्ट्राला कमजोर करण्याचे षड्यंत्रच वाटू लागले आहे. हिंदूंचे सण-उत्सव होणारच. ते रोखण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल व शिवसेना त्या असंतोषाचे नेतृत्व करेल, हे आम्ही डोके ठिकाणावर ठेवून बजावत आहोत. मग काय व्हायचे ते होऊ द्या असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.