इच्छुकांची ओबीसी दाखला मिळविण्यासाठी धडपड
By Admin | Updated: July 20, 2016 02:06 IST2016-07-20T02:06:17+5:302016-07-20T02:06:17+5:30
नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला असे आरक्षण आल्याने अनेक मातबर इच्छुकांनी ओबीसीचा दाखला मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

इच्छुकांची ओबीसी दाखला मिळविण्यासाठी धडपड
लोणावळा शहरात विकासकामांच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या तुंगार्ली गावठाण या प्रभाग क्र. २मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला असे आरक्षण आल्याने अनेक मातबर इच्छुकांनी ओबीसीचा दाखला मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. काहींनी दूरदृष्टीने अगोदरच दाखला मिळवूनदेखील ठेवला आहे.
पूर्वीच्या तुंगार्ली या चार सदस्यीय प्रभागातून न्यू तुंगार्ली व तुंगार्ली असे दोन प्रभाग झाले आहेत. मागील १५ वर्षांपासून या प्रभागाचे राजू बच्चे हे नेतृत्व करत असून, मागील पंचवार्षिकमध्ये अशोक मावकर हे दोघेही सर्वसाधारण जागेवर निवडून आले होते. ओबीसी महिला जागेवर जयश्री इंगूळकर यांनी सर्वाधिक मते घेतली होती. हे तीनही नगरसेवक हे तुंगार्ली गावठाण भागातील आहे.
लोणावळा शहराच्या टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या तुंगार्ली प्रभागात नागरिकांच्या सहभागातून पहिला कचराकुंडीमुक्त प्रभाग तयार करण्यात आला. शहराच्या इतर प्रभागांसाठी तो रोल मॉडेल ठरला. तसेच या प्रभागातील गावभागातील रस्ते, गटारे इत्यादी कामे पूर्ण झालेली असली, तरी सर्वे नं. २ चा गुंठेवारीचा प्रश्न अद्यापही पूर्णत: सुटलेला नाही. अनेक सोसायट्यांचे रस्ते आजही खड्डेमय आहेत. या प्रश्नांच्या बळावर ही निवडणूक लढवली जाणार असून, खुल्या प्रवर्गातील अनेक इच्छुकांनी ओबीसीचा दाखला मिळविण्याची धडपड सुरू केली आहे.
काहींना त्यामध्ये यश आले असून, काही अजूनही प्रयत्नशील आहेत. या प्रभागातील विद्यमान नगरसेविका जयश्री इंगूळकर, भाजपाच्या माजी अध्यक्षा सुरेखा पाडाळे, आशा खिल्लारे, सिंधू मालपोटे, माजी नगराध्यक्षा उषा चौधरी, अश्विनी आसवले, विद्यमान नगरसेवक राजू बच्चे, अशोक मावकर, जयवंत वांद्रे, गणेश मावकर, गणेश इंगळे, संजीव आसवले, रितेश गोसावी, मंगेश मावकर आदींचा समावेश आहे. यापैकी काहींच्या नजरा न्यू तुंगार्ली प्रभागावर, तर काहींच्या ओबीसीचा दाखला मिळवत तुंगार्ली गावठाणावर आहेत.