मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदेश दिल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राजीनामा दिला. त्यांना नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्याशी निकटचे संबंध भोवले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना शुक्रवारी सायंकाळी वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले आणि त्यांना आयोगाच्या अध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर चाकणकर या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना रात्री नऊच्या सुमारास देवगिरी बंगल्यावर भेटल्या. त्यांनीही चाकणकर यांना तत्काळ राजीनामा देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्यापुढे पर्यायच उरला नाही.
खरात प्रकरणाशी आपला संबंध नाही असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण दोन्ही नेत्यांनी त्यांचा युक्तिवाद मान्य केला नाही आणि राजीनामा द्यावाच लागेल असे बजावून सांगितले. आपली बाजू मांडणारे एक पत्र चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. मात्र, हे प्रकरण किती गंभीर आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधत चाकणकर यांना कडक शब्दांत समज दिली आणि राजीनामा द्यायला सांगितले.
...अन् दुपारीच राजीनामा द्यायला सांगितले ! राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल्ल पटेल यांनी चाकणकर यांचे नाव न घेता तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक जीवनात वावरताना आपण कोणाबरोबर बसावे-भेटावे याचे भान ठेवलेच पाहिजे. आपल्याविषयी संशय निर्माण होणे कधीही योग्य नसते. समोर आलेल्या प्रकरणात संबंधितांवर पक्ष नक्कीच कारवाई करेल, असे सांगत पटेल यांनी चाकणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदावरून गच्छंती अटळ असल्याचे स्पष्ट संकेत दुपारीच दिले. पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना भेटून राजीनामा द्या, असे दुपारीच चाकणकर यांना सांगितले, अशी माहिती आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपविलाआयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा होता. दिवसभराच्या वेगवान घडामोडीनंतर रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहलेला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविला.
त्यांचे राजीनामा पत्र सुनेत्रा पवार या मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील व मुख्यमंत्री ते राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवतील.
पक्षात पाठराखण नाहीचएकीकडे विरोधकांनी केलेले लक्ष्य आणि आपल्याच पक्षात कोणीही पाठराखण करत नसल्याचे चित्र चाकणकर यांच्याबाबत शुक्रवारी स्पष्ट झाले. भोंदूबाबा खरातवर महिलांवरील अत्याचाराचे अनेक आरोप आहेत, त्यातच चाकणकर यांचे खरातशी जवळचे संबंध आहेत आणि तरीही चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणे अजिबात योग्य होणार नाही,अशी भावना भाजपकडूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळविण्यात आली असे समजते.
महासंचालकांनाही भेटल्या, पत्र दिले -गेले तीन दिवस माध्यमांना सामोरे न गेलेल्या रुपाली चाकणकर या शुक्रवारी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांना त्यांच्या कार्यालयात भेटल्या व खरात प्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी आणि आरोपांमधील सत्य समोर यावे असे पत्र त्यांनी दिले.
प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार? : चाकणकर या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. या पदाचाही राजीनामा देण्यास त्यांना पक्षनेतृत्वाने सांगितल्याची माहिती आहे.
खरातच्या ट्रस्टवरील माझा कार्यभार ८ ऑगस्ट २०२५ रोजी संपला आहे. खरात पती-पत्नीला माझ्या परिवाराने गुरू मानले. ही घटना समजली तेव्हा मला धक्का बसला. खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती असायचे कारण नव्हते. माझ्याविषयी चुकीच्या बातम्या सुरू आहेत. रूपाली चाकणकर
Web Summary : Rupali Chakankar resigned as State Women's Commission chief after Chief Minister Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar demanded it. The resignation follows controversy surrounding her ties to alleged fraudster Ashok Kharaat. Party leaders expressed displeasure, signaling her removal was inevitable due to the controversy.
Web Summary : रूपाली चाकणकर ने मुख्यमंत्री फडणवीस और उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार के इस्तीफे की मांग के बाद राज्य महिला आयोग के अध्यक्ष पद से इस्तीफा दे दिया। यह इस्तीफा कथित धोखेबाज अशोक खराट से उनके संबंधों को लेकर विवाद के बाद आया है। पार्टी नेताओं ने नाराजगी जताई, जिससे उनके निष्कासन की आशंका बढ़ गई।